बेंगळूर – व्हन्नावर रोडवर दुर्घटना : आज अंत्यसंस्कार
वार्ताहर/ किणये
नावगे गावचा सुपुत्र लष्करी जवान शिवाजी आनंद तळवार यांचे बेंगळूर- व्हन्नावर रोड येथे रविवार दि. 4 रोजी रात्री 8 वाजता अपघाती निधन झाले. लष्करी सेवेत राहून एनसीसी मुख्य अधिकारी म्हणून म्हैसूर येथे ते सेवा बजावत होते. गेल्या महिन्याभरापूर्वी ते आपल्या मूळ गावी नावगे (ता. बेळगाव) येथे सुटीनिमित्त आले होते.
रविवारी ते घरातून नोकरीवर पुन्हा रुजू होण्यासाठी दुचाकीवरून जात असताना बेंगळूर – व्हन्नावर रस्त्यावर रविवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास जेसीबी घेऊन जाणारी ट्रक व दुचाकी यांचा अपघात झाला. या अपघातात ते ठार झाले. या घटनेमुळे नावगे पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी त्यांचे नातेवाईक घटनास्थळी गेले. शासकीय प्रक्रियेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर नावगे गावात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.