शॅडो कौन्सिल, स्थानिक रहिवाशांचा आरोप : सदर परप्रांतियांच्या मोकाट फिरण्यास आक्षेप
प्रतिनिधी / मडगाव
नावेली येथील इनडोअर स्टेडियममध्ये आसरा देण्यात आलेल्या बेघर परप्रांतीय मजुरांवर योग्य प्रकारे देखरेख ठेवली जात नसल्याबद्दल शॅडो कौन्सिल फॉर मडगाव व स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र मोकळे फिरण्याबरोबर हे मजूर चक्क स्टेडियममध्ये दारू घेऊन जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
विदेशातून आलेल्या भारतीयांना घरांमध्ये विलगीकरणात राहण्यास सांगून ते बाहेर पडू नयेत यासाठी सरकारने सक्तीचा धाक दाखविला होता. मात्र आसरास्थळात आसरा देण्यात आलेल्या बेघर परप्रांतियांना मिळेल तेथे फिरण्याची मोकळीक कशी दिली जात आहे, असा सवाल शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो व कोलमरड येथील स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दारू घेऊन जाताना पकडल्याचा दावा
या मजुरांना दारूच्या बाटल्या घेऊन आसरास्थळात जाताना स्थानिकांनी पकडल्याचा दावा कुतिन्हो यांनी केला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद असली, तरी कोणत्या अड्डय़ांवर दारू मिळते ते या मजुरांना चांगलेच माहीत आहे. चक्क आसरास्थळात दारूच्या बाटल्या नेऊन आंतमध्ये हे मजूर दारू पित असतात, असा दावा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.
आवारातील फळे पळविण्याचे सत्र
आसरास्थळाच्या भिंतीला शिडी लावून हे मजूर बाहेर पडत असल्याचे कुतिन्हो यांनी नजरेस आणून दिले. या मजुरांनी मोकळे फिरताना सध्या कोलमरड येथील घरांच्या आवारात शिरून झाडांवरील आंबे व अन्य फळे पळविण्याचे सत्रही अवलंबविले आहे. मोकळे फिरत असल्याने या परिसराची चांगली माहिती काढून घेऊन पुढे त्यांच्याकडून चोरी-दरोडे घालण्यासारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे मोकाट फिरणे तत्काळ बंद करावे, अशी मागणी शॅडो कौन्सिल व स्थानिक रहिवाशांकडून उचलून धरण्यात आली आहे.