नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार, शिवाजी रोड, रविवार कारंजा, कापड बाजार, जुने नाशिक, दहीपूल, कानडे मारुती लेन, दुधबाजार, एमजी रोड परिसरासह प्रमुख बाजारपेठा रविवार दि.२१ पासून पुढील रविवार दि. २८ पर्यत स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी तसेच हॉकर्स असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सराफ बाजार बंद रहाणार नाही असे सराफ असोसिएशनने अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले आहे.
शहरातील पंचवटी, जुने नाशिक, द्वारका, अशोक स्तंभ, रविवार कारंजा आदी भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून बंदबाबत निर्णय घेतला जात नसला, तरी नागरिकांसह सर्वपक्षीय नगरसेवक व विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यात खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा, जुने नाशिक परिसर पुढील आठ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.