ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिक शहरात तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोना रिपोर्ट आज सकाळी आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ही महिला नाशिक शहरातील पहिली कोरोनाबळी ठरली आहे.
मृत महिला मूळची उत्तरप्रदेशची असून, ती 2 वर्षांपासून पतीसोबत नाशिक शहरातील बजरंग वाडी येथे वास्तव्यास होती. शनिवारी सायंकाळी तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे वाटल्याने रुग्णालयाने तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. त्यानंतर दोन तासातच या महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी आरोग्य प्रशासनाला महिलेचा रिपोर्ट मिळाल्यानंतर ही बाब समोर आली. या महिलेच्या मृत्यूने नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 13 वर पोहचली आहे.