दिवसभरात 17 जणांना बाधा : 14 पुरुष, 3 महिलांचा समावेश
वार्ताहर/ निपाणी
निपाणी शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांसह मृतांची संख्या वाढत आहे. यातून जनता कर्फ्यू लागू करण्याची गरज व्यक्त होत असतानाच भिन्न मतप्रवाह पुढे येत आहेत. असे असताना शुक्रवारी बेळगाव येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या येथील उड्डाण पुलानजीकच्या 52 वर्षीय पेट्रोल पंपचालकाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 14 पुरुष व 3 महिला अशा 17 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. सामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जागा उपलब्ध होत नाही. तर खासगी दवाखान्याचा होणारा खर्च परवडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अधिकतर कोरोना बाधा झाल्याची लक्षणे असणारे रुग्ण उपचारासाठी पुढे येताना दिसत नाहीत. यामुळे धोका अधिक प्रमाणात वाढत असून, अशीच परिस्थिती राहिल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती निपाणी परिसरात व्यक्त होत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू हा तात्पुरता पर्याय ठरु शकतो. पण याबाबत मतभिन्नता निर्माण झाली आहे. हे टाळताना यातून योग्य तो पर्याय काढणे निपाणीसह परिसरासाठी हितकारक ठरणार आहे. त्याचप्रमाणे जर जनता कर्फ्यू जारी न झाला तरी येत्या 15 दिवस तरी अनावश्यक घराबाहेर येणे टाळणे आवश्यक आहे.