उमेदवारांचे भवितव्य होणार मशीनबंद
प्रतिनिधी/ निपाणी
येथील प्रभाग क्र. 31 मधील रिक्त जागेसाठी सोमवारी निवडणूक होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान होणार असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. येथील ताशीलदार फ्लॉटमधील उर्दू शाळेच्या दोन खोल्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
प्रभाग 31 मध्ये एका जागेसाठी भाजपतर्फे दत्तात्रय जोत्रे, काँग्रेस पुरस्कृत आघाडीतर्फे सुनीता गाडीवड्डर, तिसऱया आघाडीतर्फे सुनील गाडीवड्डर तर अपक्ष उमेदवार म्हणून संगिता येडनाईन असे चार उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या आठ दिवसातील प्रचार पाहता येथे भाजप व काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळाली. प्रचारा दरम्यान भाडोत्री कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाचाही प्रयत्न झाला. प्रचार सभांमधूनही मतदारांना साद घालण्यात उमेदवारांनी कोणतीही कसर सोडली नाही.
सदर प्रभागामध्ये ताशीलदार फ्लॉट, बडमंजी फ्लॉट, गुरुदत्तनगर, लेटेक्स कॉलनी आदी भागाचा समावेश होतो. याठिकाणी 1856 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रचारा दरम्यान झालेली चुरस पाहता मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मतदानाच्या आधी लक्ष्मी वर्षाव देखील मोठय़ा प्रमाणात झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढतीत मतदारराजा कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबरच ममदापूर केएल येथील प्रभाग क्र. 2 मधील रिक्त जागेसाठीही सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान होत आहे.