प्रशासनाची हुकूमशाही : पत्रकारांकडून निषेध मोर्चा, मानवी साखळी
प्रतिनिधी
निपाणी
नगरपालिकेत नूतन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष, आयुक्त व नगरसेवकांच्या हुकूमशाहीचा अनुभव पत्रकारांना आला. सभा सुरू होण्यापूर्वीच नागरिक व पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवत आजवरच्या गौरवशाली प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम पालिका प्रशासनाने केल्याने याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्यासमोरच हा गोंधळ होत असताना त्यांनी प्रतिक्रिया न दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नगरपालिकेत बुधवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी या सभेला उपस्थित राहण्याची विनंती नगरपालिकेतर्फे पत्रकारांना करण्यात आली होती. पत्रकार सभेस हजर होते. मात्र, ऐनवेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले व आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी पत्रकारांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी सर्व विरोधी नगरसेवकांनी आजवर पत्रकारांना टाळून सर्वसाधारण सभा झाली नसल्याचे सांगत यास विरोध केला. यावेळी पत्रकारांनीही ही लोकशाहीची गळचेपी असल्याचे सांगत सभागृहाबाहेर जाण्यास नकार दिला.
पोलिसी बळाचाही वापर
मात्र, सत्तेच्या धुंदीत बेभान झालेल्या पालिकेच्या सत्ताधारी गटाने पोलिसी बळाचा वापर करत सभागृहात उपस्थित नागरिक व पत्रकारांना बाहेर काढले. या दंडूकेशाहीचा निषेध करत पत्रकारांनी सभागृहाबाहेर व पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
निषेध करावा तितका थोडाच
सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या माजी आमदार काका पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, राजेश कदम, बाळासाहेब देसाई-सरकार, दिलीप पठाडे यांनीही मनोगत व्यक्त करून पालिका प्रशासनाचा निषेध केला.
यानंतर सर्व पत्रकारांनी जुना पी. बी. रोडवरून मोर्चा काढत संभाजीराजे चौकात साखळी आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाच्या हुकूमशाहीचा निषेध करून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर मोर्चाने तहसीलदार कार्यालयापर्यंत जाऊन प्रांताधिकारी युकेशकुमार व तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अन् नगरसेविका पत्रकारांवर धावल्या
सभेला नगरपालिका प्रशासनातर्फेच पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काही नगरसेविकांनी अंगावर धावून जात पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पालिका प्रशासनाची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करतानाही केवळ विरोधाच्या उद्देशानेच हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी महिलांचा वापर होत आहे का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
विविध संघ, संघटनांचा पाठिंबा
दरम्यान, पालिकेच्या सभेतून नागरिक व पत्रकारांना बाहेर काढल्याचे पडसाद शहर व ग्रामीण भागात सर्वत्र उमटले. पालिका प्रशासनाच्या या हुकूमशाहीचा सर्वस्तरातून निषेध करण्यात आला. तसेच विविध संघ, संघटनांनीही पत्रकारांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. विरोधी नगरसेवकांनीही पुढील सर्वसाधारण सभेस पत्रकार व नागरिकांना प्रवेश दिल्याशिवाय आपण उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले. नागरिकांनीही आपण पालिकेला कर भरतो, मग सर्वसाधारण सभेस राहण्याचा अधिकार असून तो कोणीही नाकारू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.