प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात निर्जंतुकीकरण राबविण्यासाठी महापालिकेने 7 वाहनांची व्यवस्था केली होती. पण निर्बंधित परिसरात दोन वाहने कायमस्वरूपी ठेवावी लागत आहेत. शहराच्या अन्य भागात निर्जंतुकीकरण करण्यास वाहनांची कमतरता भासत आहे. त्यामुळे महापालिकेने आणखीन एक वाहन तयार केले असून याची पाहणी बुधवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली.
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. याकरिता जेट सकींग मशीन, पाण्याचे टँकर व अन्य वाहनांचा वापर करण्यात येत आहे. या वाहनांना स्प्रे बसविण्यात आले असून सात वाहने या कामी कार्यरत आहेत. निर्बंधित क्षेत्रात सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच परिसरात फिरणाऱया वाहनांवर औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे लागत आहे. त्याकरिता प्रत्येक निर्बंधित क्षेत्रात दोन वाहने कायमस्वरूपी ठेवावी लागत आहेत. त्यामुळे शहराच्या अन्य भागात निर्जंतुकीकरण करण्यास अडचणी येत आहेत. त्याकरीता स्वच्छता मोहिमेसाठी राबविण्यात येणाऱया ट्रक्टरला स्पे बसविण्यात आले असून या वाहनाद्वारे शहरात फवारणी करण्यात येणार आहे. या वाहनाची चाचणी बुधवारी महापालिका आयुक्तांनी घेतली.