अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 1 एप्रिल 2022 सकाळी, 11.50
● 25 महिन्यांनंतर जिल्हा पूर्वपदावर
● जिल्ह्यात 3 बाधित
● 419 चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. त्यामुळे जिल्हावासिय सुखावले आहेत. 25 महिन्यांनंतर जनजीवन सुरळीत झाले आहे.
जनतेचे मानले आभार
कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले आहेत.
25 महिने महामारीचा मुकाबला
मार्च 2020 पासून महामारीचे निर्बंध जिल्ह्यात लागू झाले होते. 24 मार्चला टाळेबंदी सुरू झाली. या दोन वर्षांत जिल्ह्याने धीराने महामारीचा मुकाबला केला. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेने जीवतोड मेहनत केली. सध्या जिल्हा पुर्णपणे कोरोना मुक्त होण्याच्या वाटेवर असताना निर्बंधमुक्तीची घोषणा झाली आहे.
तीन बाधित
जिल्ह्यात गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात तीन बाधित आले असून वाई 1, सातारा 2 अशी बाधितांची संख्या आहे. 419 चाचण्या झाल्या आहेत.
शुक्रवारी
नमुने -419
बाधित-03
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,71,523
बाधित-2,79,198
मृत्यू-6683
मुक्त-2,71,792