खासबाग येथील घटना : सव्वालाखाचा ऐवज लांबविला
प्रतिनिधी / बेळगाव
बनशंकरीनगर-खासबाग येथील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. या संबंधी गुरुवारी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
रमेश रामचंद्र दळवी यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. 2 मार्च रोजी चोरीची घटना उघडकीस आली असून रमेश हे उपचारासाठी मुंबईला गेले होते. गुरुवारी मुंबईहून परतल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून 1 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ग्रॅम सोने, 100 ग्रॅम चांदीचे दागिने, 3 मनगटी घडय़ाळे, एक टी. व्ही. चोरटय़ांनी पळविली आहे. डोळय़ाच्या शस्त्रक्रियेसाठी रमेश व त्यांचे कुटुंबीय 18 फेब्रुवारी रोजी मुंबईला गेले होते. 2 मार्च रोजी त्यांच्या घरी काम करणाऱया महिलेने त्यांना फोन करून चोरीची घटना कळविली.
अंगण झाडण्यासाठी आली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. त्याच दिवशी रमेश यांना ही घटना कळविण्यात आली असली तरी शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते गुरुवारी बेळगावला पोहोचले. तोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.