आपच्या कार्यकर्त्यांवर अंडी, टोमॅटोचा मारा
प्रतिनिधी/ मडगाव
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काल दोन वर्षे पूर्ण झाली. या द्विवर्षीपूर्तीच्या निमित्ताने त्या आमदारांना केक देण्यासाठी गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांना नुवेचे भाजपचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा यांच्या कार्यकर्त्यांनी अडविल्याने काल शनिवारी नुवेत आपचे आमदार बाबाशान यांच्या कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा झाला. बाबाशानच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्यावर अंडी तसेच टोमॅटोचा मारा केला. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून आपचे गोवा प्रमुख राहुल म्हांबरे यांनी आज रविवारी नुवे येथे आमदार बाबाशान यांच्या घराजवळ धरणे धरण्याचा इशारा दिला आहे. काल जी घटना घडली ती निषेधार्थ असून अशा घटनांना आप घाबरत नसल्याचे श्री. म्हांबरे यांनी म्हटले आहे.
मंत्री फिलीप नेरीने स्वीकारला ‘केक’
काल शनिवारी आपच्या कार्यकर्त्यांनी वेळळीचे भाजपचे आमदार तथा मंत्री फिलीप नेरी यांच्या घरी भेट देऊन त्यांना भाजप प्रवेशच्या द्विवर्षीपूर्तीनिमित्त केक दिला. तो फिलीप नेरी यांनी स्वीकारला व केक ही ‘मिठाई’ असल्याने, मिठाई आनंदोत्सव साजरा करण्यासाठीच दिला जात असल्याची उलट प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच हा राजकारणाचा भाग असून 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला शुभेच्छा दिल्या. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला असता मंत्री नेरी म्हणाले की, तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आला असाल तर टीका कशाला करतात.
आपच्या कार्यकर्त्यांना नुवेत रोखले
आपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली आपचे कार्यकर्ते केक देण्यासाठी नुवेत आमदार बाबाशान यांच्या घरी पोहचले, तेव्हा उपस्थित असलेल्या बाबाशान यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. प्रतिमा कुतिन्हो तुम्ही नावेलीच्या तुम्ही नुवेत कशाला आलात, आमच्या आमदाराला केक देण्याची आवश्यकता आहे का ? असा सवाल उपस्थित करतात, प्रतिमा कुतिन्हो यांनी आपल्या हातातील केक नुवेच्या निमंत्रकाला बोलावून केक त्याच्या हाती दिला व तो आमदाराला देण्यास सांगितले. यावेळी बाबाशान यांनी घेतलेला निर्णय योग्यच असून आमच्या आमदारांचे आम्ही पाहून घेऊ, त्यासाठी आपची गरज नसल्याचे सांगताच, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले.
आपच्या कार्यकर्त्यांची हुर्या
बाबाशान यांच्या कार्यकर्त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांची हुर्या उडविली. दोन्ही बाजूनी जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली. आरोप-प्रत्यारोप झाले. बाबाशान यांनी नुवेच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी बाबाशानच्या कार्यकर्त्यांनी अंडी व टोमॅटोचा मारा आपच्या कार्यकर्त्यांवर केला. आपने आणलेला केकही गोंधळात हिसकावून घेतला व तोही पुन्हा आपच्या कार्यकर्त्यावर फेकून मारण्याचा प्रकार घडला.
बराचवेळ दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी सुरुवातीला दोनच पोलीस पोहचले. मात्र, ते परिस्थितीवर नियंत्रण आणू शकले नाहीत. यावेळी प्रतिमा कुतिन्हो यांनी बाबाशान यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्यात आले. यावेळी किंचित धक्काबुक्की झाली. यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला व नंतर पोलिसांनी आपच्या कार्यकर्त्यांना तेथून बाजूला काढले.
ही तर बाबाशानच्या गुंडाची गुंडागिरी ः प्रतिमा
नुवेचे आमदार यांना भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आपचे कार्यकर्ते गेले असता, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी गुंडागिरी केली त्यांचा आपण निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया प्रतिमा कुतिन्हो यांनी व्यक्त केली. बाबाशान यांनी नुवेच्या जनतेचा विश्वासघात केला. गेल्या निवडणुकीत भाजप नको असल्याने मतदारांनी त्यांना काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून दिले होते. मात्र, ते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी भाजपमध्ये गेल्याची टीका प्रतिमा कुतिन्हो यांनी व्यक्त केली. पुढील निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप प्रवेशामुळे विकास
आमदार बाबाशान यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. यापूर्वी नुवे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या आमदारांना नुवेचा विकास साधण्यात अपयश आले होते. बाबाशान यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानेच आज या मतदारसंघाच्या विकासकामांना चालना मिळाल्याची प्रतिक्रिया एका पंचसदस्य महिलेने व्यक्त केली. आमचा पूर्ण पाठिंबा बाबाशान यांना असून ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जी कृती केली ती योग्य नव्हती. पक्षांतर हा विषय वेगळा असून त्या संदर्भात निर्णय घेण्यास नुवेतील मतदार सक्षम आहे. पण, ‘आप’ने जी कृती केली ती निषेधार्थ असल्याचे त्यांनी सांगितले.