भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र – विवाहाच्या मुद्दय़ावर मतदारांची फसवणूक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या बशीरहाट येथील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विवाहाचे प्रकरण आता लोकसभेपर्यंत पोहोचले आहे. भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून नुसरत यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
नुसरत जहां यांचे वर्तन चुकीचे आहे. विवाहाप्रकरणी त्यांनी स्वतःच्या मतदारांना फसविले आहे. तसेच संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविला आहे. हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीसमोर मांडले जावे, तसेच चौकशी करून नुसरत यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मौर्य यांनी केली आहे.
नुसरत यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना स्वतःचे नाव नुसरत जहां रुही जैन असल्याचे सांगितले होते. लोकसभेच्या संकेतस्थळावर त्यांच्या पतीचे नाव निखिल जैन नमूद आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी त्यांच्या विवाहाच्या रिसेप्शनमध्ये सामील झाल्या होत्या. कुणीही नुसरत यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नये. पण त्यांची अलिकडची विधाने पाहता त्यांनी जाणूनबुजून संसदेला चुकीची माहिती दिल्याचा अर्थ निघतो असे उत्तरप्रदेशातील बदायूंच्या खासदार संघमित्रा यांनी पत्रात नमूद केले आहे.
निखिल आणि नुसरत यांचा विवाह तुर्कस्तानात 19 जून 2019 रोजी तेथील नियमांच्या आधारावर झाला हाता. यामुळे नुसरतने निखिलपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज करण्यास नकार दिला आहे. तुर्कस्तानचा कायदा भारतात मान्य नाही, यामुळे आमच्या विवाहाला येथे कुठलीच मान्यता नाही. मी निखिलसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते असे नुसरत यांचे सांगणे आहे.
नुसरत यांचा आरोप
नुसरत यांनी निखिल यांच्यावर स्वतःच्या खात्यातील पैसे काढल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी बँक अधिकाऱयांसमोर भूमिका मांडली असून लवकरच पोलिसांकडे तक्रार नोंदविणार असल्याचे नुसरत यांनी म्हटले होते. या आरोपांवर पती निखिल जैनने स्पष्टीकरण दिले होते. हे आरोप खोटे आहेत. नुसरतकरता मी बरेच काही केले आहे. विवाह नोंदणीस नुसरत नेहमीच टाळाटाळ करत होती. 2020 पासून तिच्या वर्तनात बदल होऊ लागल्याचे निखिल यांनी म्हटले आहे.