रशियाच्या 38 मुत्सद्यांची केली हकालपट्टी
नेदरलँड्स आणि बेल्जियमने स्वतःच्या देशांमधील रशियाच्या 38 मुत्सद्यांची हकालपट्टी केली आहे. तर रशियाने देखील बाल्टिक देशांच्या 10 मुत्सद्यांना देशाबाहेर काढले आहे. बेल्जियमने रशियाच्या 21 मुत्सद्यांना देशाबाहेर काढण्याची घोषणा केली आहे. हेरगिरी आणि सुरक्षेच्या कारणास्तव या मुत्सद्यांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याचे बेल्जियमकडून सांगण्यात आले. तर नेदरलँड्सच्या विदेश मंत्रालयाने रशियाच्या 17 अधिकाऱयांच्या हकालपट्टीची माहिती दिली आहे.
हकालपट्टी करण्यात आलेले लोक रशियन मिशनच्या आड हेरगिरी करत होते असे विदेशमंत्री वोपके होकेस्ट्रा यांनी सांगितले आहे. चेक प्रजासत्ताकने देखील एका रशियन मुत्सद्यांची हकालपट्टीचा निर्णय घेत युरोपमधील रशियन हेरांची उपस्थिती कमी करू इच्छित असल्याचे म्हटले आहे.
तर रशियाने एस्टोनिया, लातवियाचे प्रत्येकी तीन तर लिथुआनियाच्या 4 मुत्सद्यांना देशाबाहेर काढले आहे. तिन्ही बाल्टिक देशांनी रशियाच्या 10 मुत्सद्यांना देशाबाहेर काढले होते. तर याचदरमन नाटोने अनुमती दिल्यास बाल्टिक देशांमध्ये 800 सैनिक पाठविण्याची तयारी डेन्मार्कने दर्शविली आहे.
युरोपीय महासंघाशी जिनपिंग करणार चर्चा
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान ली केकियांग हे युक्रेन संकटावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी युरोपीय परिषदचे अध्यक्ष चार्ल्स मायकल, युरोपीय आयोग अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन आणि युरोपीय महासंघाच्या विदेश धोरणाचे प्रमुख जोसेप बोरेल यांना भेटणार आहेत. यादरम्यान द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा होणार आहे.