वृत्तसंस्था/काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी नवे सरकार स्थापन झाल्याच्या दाने महिन्यांनी बुधवारी नारायण खडका यांची विदेशमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. खडका यांना संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत देशाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी विदेश मंत्री नियुक्त करण्यात आल्याचे देउबा यांच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले.
खडका यांना विदेशमंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर घेण्यात आला. मंत्रिपद स्वीकारल्यावर खडका यांनी सिंघा दरबार येथे जात कार्यालयाला भेट दिली आहे. तर बुधवारी संध्याकाळी ते अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत.
नवनियुक्त मंत्री खडका हे संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या 76 व्या सत्रात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल होणार आहेत. सत्तारुढ आघाडीतील घटक पक्षांसोबत सल्लामसलत केल्यावर पंतप्रधान देउबा यांनी खडका यांची विदेशमंत्री म्हणून निवड केली आहे. विदेशमंत्रालय नेपाळी काँग्रेसकडेच राहणार असल्याचे देउबा यांनी घटक पक्षांना सांगितले होते. जुलै महिन्यात देउबा हे पाचव्यांदा देशाचे पंतप्रधान झाले होते.