वृत्तसंस्था/ काठमांडू
केपी ओली शर्मा सरकारच्या इशाऱयावर भारतीय वृत्तवाहिन्यांवर घातलेली बंदी नेपाळच्या केबल ऑपरेटर्सनी अखेर हटविली आहे. रविवार संध्याकाळपासून नेपाळमध्ये भारतीय वाहिन्यांचे प्रसारण सुरू झाले आहे. मॅक्स डिजिटल टेलिव्हिजनचे उपाध्यक्ष धुर्बा शर्मा यांनी केबल ऑपरेटर्सच्या बैठकीनंतर ही बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान ओली आणि चिनी राजदूताशी संबंधित वृत्तांकनावरून नारज होत नेपाळने भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घातली होती. परंतु मोठय़ा संख्येत नेपाळी प्रेक्षकांनी भारतीय वृत्तवाहिन्यांना सब्सक्राइब केले आहे. ग्राहकांच्या दबावामुळे नेपाळच्या केबल ऑपरेटर्सना प्रसारण पुन्हा सुरू करणे भाग पडले आहे.
नेपाळने सीमा वादानंतर भारतीय वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली होती. नेपाळने यासंबंधी अधिकृत आदेश काढला नसला तरीही केबल ऑपरेटर्सना याकरता भाग पाडण्यात आले होते.
चीनचे अनुकरण
पंतप्रधान ओली यांनी भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी लादून चीनचे अनुकरण चालविले आहे. चीननेही भारतीय वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली होती. भारतीय वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चिनी नागरिकांना वस्तुस्थिती समजण्याची भीती ड्रगनला सतावत होती.