वृत्तसंस्था/ पुणे
नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी अत्यंत निराशजनक झाल्याने नेमबाज प्रशिक्षक पॅव्हेल स्मिर्नोव्ह आणि ओलेग मिखालोव्ह यांना पदावरून काढण्यात येणार असल्याचे संकेत अखिल भारतीय रायफल संघटनेचे प्रमुख रणिंदर सिंग यांनी संकेत केले आहे.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारामध्ये भारताच्या पुरूष आणि महिला नेमबाजांनी पूर्ण निराशा केली. या स्पर्धेसाठी संघटनेतर्फे भारतीय नेमबाजांकरिता विदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले होते. पॅव्हेल आणि ओलेग यांचा संघटनेबरोबर ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत करार झाला होता. आता या दोन्ही प्रशिक्षकांच्या करारामध्ये वाढ केली जाणार नसल्याने रायफल प्रशिक्षक युक्रेनचे ओलेग आणि पिस्तुल प्रशिक्षक रशियाचे पॅव्हेल यांना मायदेशी परतावे लागेल. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर ओलेग यांची रायफल प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर 2012 च्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेनंतर भारतीय नेमबाज संघाला प्रशिक्षक पॅव्हेल यांचे मार्गदर्शन लाभले होते. पॅव्हेल आणि ओलेग यांना मासिक सुमारे 7500 डॉलर्सचे मानधन दिले जात होते. साईतर्फे त्यांची निवासाची मोफत सोय करण्यात आली होती.