तालिबानचे फर्मान – जीन्स घालणाऱया मुलांना मारहाण
तालिबान स्वतःच्या वृत्तीत सुधारणा झाल्याचा दावा करत असला तरीही सोशल मीडियावर शेअर होणाऱया व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून त्याचा खरा चेहरा जगासमोर येत आहे. तालिबानने जीन्स परिधान करण्यावर बंदी घातली आहे. तसेच मुलींना नेल पॉलिशच्या वापरापासून दूर राहण्याची ताकीद दिली आहे. अलिकडेच जीन्स घातलेल्या काही युवकांना अमानुष मारहाण करण्यात आली होती.
नेल पॉलिशचा वापर करू नका अशी ताकीद तालिबानने मुलींना तसेच महिलांना दिली आहे. कंधारमध्ये तालिबानने महिला तसेच मुलींसाठी फतवा काढला आहे. या फतव्यात नेल पॉलिशचा वापर प्रतिबंधित असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच नेल पॉलिश वापरणाऱया महिलेची बोटं कापण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे. हीलयुक्त सँडल वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
तालिबानी दहशतवादी रस्त्यांवर फिरून लोकांना घाबरवत आहेत. आतापर्यंत अनेक मुलींचे अपहरण करून त्यांना अन्य देशांमध्ये विकण्यात आले आहे. तर काही मुलींचा बळजबरीने दहशतवाद्यांशी विवाह लावून देण्यात आला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी पूर्वीच्या राजवटीतही अशाप्रकारचेच अत्याचार केले होते. याचमुळे बहुतांश महिला अफगाणिस्तानमधून बाहेर पडू इच्छितात. काबूल विमानतळावर अद्याप शेकडो महिला विमानातून विदेशी जाण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत.