ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत मिळणार : सोलार रूफ टॉप पॅनलची पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
ट्रान्स्फॉर्मर दुरूस्तीसाठी आल्यानंतर वाट पाहण्याची गरज नाही. त्याच क्षमतेचा दुसरा ट्रान्स्फॉर्मर बदलून देण्यासाठी नेहरूनगर येथील केपीटीसीएल स्टोअरमध्ये ट्रान्स्फॉर्मर बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकमध्ये प्रत्येक क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध असणार आहेत. यामुळे ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. या ट्रान्स्फॉर्मर बँकचे उद्घाटन शुक्रवारी ऊर्जामंत्री सुनिलकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक भारती डी, हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता गिरीधर कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एम. टी. अप्पण्णावर, प्रवीण चिकाडे यांच्यासह हेस्कॉमचे अधिकारी, कर्मचारी, केपीटीसीएलचे अधिकारी उपस्थित होते. हेस्कॉम तसेच केपीटीसीएल कार्यालयाला उर्जा मंत्र्यांनी भेट देऊन माहिती घेतली.
ऑनलाईन तक्रार केंद्राची घेतली माहिती
नेहरूनगर येथील उपविभाग 3 मध्ये साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हम्मण्णावर यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन तक्रार
ऍप्लिकेशन तयार करण्यात आले होते. यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची माहिती अधिकारी वर्गाला मिळते. या
ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मागील 2 वर्षांपासून उपविभाग 3 मध्ये काम सुरू आहे. याची माहिती उर्जामंत्र्यांनी घेतली. त्यांनी याबद्दल हेस्कॉमच्या अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.
रूफ टॉप पॅनलची पाहणी
जिल्हा पंचायत कार्यालयावर रूफ टॉप पॅनल 3 वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. यामुळे जिल्हा पंचायत कार्यालय विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून, उर्वरित वीज हेस्कॉमला विकली जाते. या प्रकल्पाला शुक्रवारी उर्जा मंत्री सुनिलकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. 30 किलो वॅट क्षमतेच्या या प्रकल्पाची त्यांनी माहिती घेतली.