प्रतिनिधी /बेळगाव
येथील बिम्स (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय) विकासासाठी जोल्ले उद्योग समूहाच्यावतीने दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. नूतन वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी व इतर कामांसाठी धर्मादायमंत्री शशिकला जोल्ले यांनी आपला उद्योग समूह व बिरेश्वर को-ऑप. सोसायटीच्यावतीने हा निधी दिला.
बिम्सच्या कारभारावर देखरेखीसाठी राज्य सरकारने नियुक्ती केलेले प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिश्वास यांच्याकडे शुक्रवारी धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. आर. जी. विवेकी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए. बी. पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती सईदा बळ्ळारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिश्वास म्हणाले, बिम्सच्या विकासासाठी अनेक उद्योजकांनी देणग्या दिल्या आहेत. अशा देणग्यांमुळे बिम्समधील वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी अनुकूल होणार आहे.