बार असोसिएशनची मुख्य सत्र न्यायाधीशांना विनंती
प्रतिनिधी/ बेळगाव
बार असोसिएशनचे अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे बेळगाव न्यायालयामध्ये काम करणारे वकील दुखवटय़ात आहेत. याचबरोबर सध्या कोरोनाचा प्रसारदेखील वाढला आहे. तेव्हा शुक्रवार दि. 14 ऑगस्टपर्यंत कोणत्याही महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी करू नये, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीशांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कामकाज काही प्रमाणात ठप्प झाले आहे. केवळ महत्त्वाच्या खटल्यांवरच सुनावणी झाली आहे. वकील, न्यायाधीश याचबरोबर पक्षकारांच्या मनामध्येही भीती निर्माण झाली आहे. अनेक वकील क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे कोणत्याही खटल्यावर वकिलांचे मत न घेता निकाल देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे आता शुक्रवारपर्यंतचे कामकाज ठप्प राहणार आहे.