प्रतिनिधी/ बेळगाव
तिसरे रेल्वेगेटनजीकचा रस्ता खराब होऊन मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. सोमवारी सकाळपासूनच या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जुने पेव्हर्स काढण्याचे काम करण्यात येत होते. यामुळे या मार्गावरील वाहतूक नेटिव्ह हॉटेलच्या मागील रस्त्याने वळविण्यात आली होती. वाहतूक वळविल्याने वाहनांच्या रांगा लागून कोंडीचा सामना करावा लागला.
आठवडय़ाचा पहिलाच दिवस असल्याने नियोजित कामाच्या स्थळी पोहचण्याची घाई होती. परंतु तिसरे रेल्वेगेटनजीक झालेल्या वाहतूक कोंडीने वेळेत पोहचणे अशक्मय होत होते. मोठी वाहने लहान मार्गावरून जात नसल्याने कोंडी होत होती. यामुळे तिसरे रेल्वेगेट ते फाऊंड्री क्लस्टरच्या कॉर्नरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहराकडे येण्यास वेळ लागत असल्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
तिसरे रेल्वेगेट येथील पेव्हर्स खचल्याने मोठमोठे खड्डे पडले होते. शहराच्या प्रवेशद्वारावरच अशाप्रकारे खड्डे पडल्याने अनेकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पावसाळय़ाच्या दिवसांत त्यामध्ये पाणी भरल्याने ते दृष्टीस पडत नसल्याने अनेक अपघातही घडत होते. रस्त्याच्या दुसऱया बाजूला उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे एकाच बाजूने सध्या वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीमध्ये अधिकच भर पडत आहे.
उद्यमबाग येथील शहराकडे येणारी वाहतूक नेटिव्ह हॉटेल मागून वळविण्यात आली. परंतु हा रस्ता अरुंद असल्यामुळे अवजड वाहने धिम्या गतीने जात होती. यामुळे वाहने अडकून पडत होती. रस्ता दुरुस्तीचे काम करताना पावसाचा व्यत्यय येत असल्यामुळे वेळ लागत होता. यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत होती. त्यामुळे दुरुस्तीचे काम लवकर संपविण्याची मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.