वृत्तसंस्था/ ढाका
यजमान बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला येथे शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर बुधवारी प्रारंभ होणार आहे. बांगलादेशचे आव्हान स्वीकारण्यास न्यूझीलंडचा संघ सज्ज झाला आहे. या मालिकेत लॅथमकडे न्यूझीलंडचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या मालिकेतील सामने बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविले जाणार आहेत.
या मालिकेतील सामने 1, 3, 5, 8 आणि 10 सप्टेंबरला होणार आहेत. अलिकडेच बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा टी-20 मालिकेत 4-1 असा दणदणीत पराभव केल्याने न्यूझीलंड संघाला ही मालिका अवघड जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टी-20 मानांकनात न्यूझीलंड सध्या तिसऱया तर बांगलादेश दहाव्या स्थानावर आहे. 2013 पासून न्यूझीलंड संघाने बांगलादेश भूमीवर 3 पैकी केवळ एक सामना जिंकला आहे.