प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील पंचगंगा स्मशानभूमीतील कंत्राटी कर्मचाऱयाचा बुधवारी कोरोनाने मृत्यु झाला. सिध्दार्थ नगर येथे राहणारा हा तीस वर्षीय कर्मचारी महिन्यापूर्वी कंत्राटीतत्वावर सेवेत रूजू झाला होता. दहा पंधरा दिवसांपूर्वी त्याला चक्कर आल्याने कसबा बावडा येथील सेवा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकाराने बडय़ा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असताना त्याचे बुधवारी निधन झाले.
दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाकडून बिलाच्या रकमेची मागणी केल्याने मृत कर्मचाऱयाचे नातेवाईक व मित्र संतप्त झाले. दरम्यान, आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे या मृत कर्मचाऱयाच्या उपचारांवरील सर्व बिल माफ करण्यात आले. मृत कर्मचाऱयाच्या पश्चात आई, पत्नी, एक महिन्याचा मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या मृत कर्मचाऱयाच्या वारसांना महापालिकेने मदत करावी, अशी मागणी निकटवर्तीयांनी केली आहे. दरम्यान, मदतीच्या मागणीसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही निकटवर्तीयांनी सांगितले.