देशात पहिल्यांदाच रेल्वेस्थानकावर प्रार्थना अन् बेबी फीडिंग कक्ष
वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरातची राजधानी गांधीनगर येथील रेल्वेस्थानकाच्या विकासाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. जानेवारी महिन्यात या नव्या स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रार्थना कक्ष तसेच स्तनपान कक्ष (बेबी फीडिंग) असणारे हे देशातील पहिले रेल्वेस्थानक ठरले आहे. पंचतारांकित हॉटेल इमारतीच्या खाली निर्माण करण्यात आलेल्या या स्थानकात अनेक प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या इमारतीच्या खाली मुख्य प्रवेशद्वारानजीक तिकीट दालनाच्या शेजारीच लिफ्ट आणि एस्कलेटर बसविण्यात आला आहे. यांच्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचणे सोपे ठरणार आहे. तिकीट दालनापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशाला डोअर प्रेम मेटल डिटेक्टरमधून पार व्हावे लागणार आहे. याचबरोबर प्रवेशद्वारानजीकच पंचतारांकित हॉटेलात प्रवेश करण्यासाठी एक गेट उभारण्यात आला आहे. रेल्वेतून उतरल्यावर प्रवासी थेट हॉटेलमध्ये पोहोचू शकणार आहे.
रुग्णालयही उपलब्ध
नव्या इमारतीत प्रवेशद्वार, तिकीट आरक्षण, लिफ्ट-एस्कलेटर, पुस्तकांचे दुकान, खाद्यपदार्थांच्या स्टॉलसमवेत प्राथमिक उपचारासाठी छोटे रुग्णालयही तयार केले जात आहे. काम पूर्ण झाल्यावर स्थानकाची जुनी इमारत रिकामी करण्यात येणार आहे. तेथे केवळ स्थानकप्रमुख आणि अन्य कर्मचारी राहणार आहेत. स्थानकात सीसीटीव्हींचे जाळे असणार आहे.