माजी सैन्यप्रमुख व्ही.के. सिंह यांचे विधान ः अल्मोडामध्ये प्रचारसभा
केंद्रीय रस्ते परिवहन राज्यमंत्री आणि माजी सैन्यप्रमुख व्ही.के. सिंह यांनी रविवारी उत्तरप्रदेशच्या अल्मोडा येथे प्रचारसभा घेतली आहे. 60 वर्षांमध्ये जे घडले नाही, ते मोदींच्या 8 वर्षांच्या कार्यकाळात झाले आहे. आज जगभरात भारताची एक वेगळी ओळख असल्याने प्रत्येक भारतीयाला गौरवाची अनुभूती होत असल्याचे ते म्हणाले.
भाजपचे स्टार प्रचारक व्ही.के. सिंह यांनी अल्मोडा येथील भाजप कार्यालयाला भेट देत सभेला संबोधित केले. भाजपच्या दुहेरी इंजिन सरकारने विकासाची नवी गाथा लिहिली आहे. उत्तराखंडबद्दल पंतप्रधान मोदींना विशेष आत्मियता आहे. चारधामच्या सर्वांगीण विकासासोबत गावागावापर्यंत विकासकमे त्यांनी पोहोचविली आहेत. रेल्वे आणि रस्त्यांशी गावांना जोडल्याचे विधान व्ही.के. सिंह यांनी केले आहे.
कुठल्याही पक्षाच्या यशामागे कार्यकर्त्यांचा हात असतो. आज जगात सर्वाधिक कार्यकर्त्यांचा पक्ष हा भाजपच आहे. जनतेला जर विकास हवा असेल तर त्यांनी कमळाचे चिन्ह निवडून भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे. पंतप्रधानांच्या हातात पूर्ण देश सुरक्षित आहे. कुणीही आता सीमेपलिकडून दहशतवादी आमच्या सीमांमध्ये घुसण्याची हिंमत करत नसल्याचे ते म्हणाले.
भाजप पूर्णपणे संघटीत असून संघटीत होऊनच काम करत आहे. कुठल्याही प्रकारची नाराजी पक्षात नाही. पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारामागे सर्व कार्यकर्ते एकवटले आहेत. उत्तराखंडमध्ये पूर्ण बहुमतासह भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.