उत्तराखंडमधील पवित्र नगरी हरिद्वार येथील निवडणूक रंगतदार होताना दिसून येतेय. हरिद्वार शहर मतदारसंघात पारंपरिक स्वरुपात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होत राहिली आहे. यंदा देखील चित्र काहीसे असेच दिसून येत आहे. परंतु बसप, सप आणि आम आदमी पक्षाकडून ही लढत रंगतदार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पक्षांचा भर भाजप आणि काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावण्यावर आहे.
1 लाख 48 हजार 731 मतदार असलेल्या हरिद्वार विधानसभा मतदारसंघात संत समुदायाचाही चांगला प्रभाव आहे. या समुदायाचे सुमारे 20 हजार मतदार या मतदारसंघात आहेत. भाजपच्या तिकीटावर पक्ष प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक मैदानात उतरले आहेत. सलग 4 वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. तर काँग्रेसने माजी नगराध्यक्ष सतपाल ब्रह्मचारी यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. सरिता अग्रवाल हे समाजवादी पक्षाकडून तर चरण सिंह सैनी हे बसपच्या वतीने निवडणूक लढत आहेत. आम आदमी पक्षाने इंजिनियर संजय सैनी यांना उमेदवारी दिली आहे.
भाजप पाचव्यांदा या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेस मुख्य विरोधक असलेल्या भाजपकडून हा मतदारासंघ हिसकावून घेण्यासाठी उतावीळ दिसून येत आहे. याचदरम्यान सप आणि बसपने स्वतःचा गमाविलेला जनाधार परत मिळविण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या मतपेढीला धक्का पोहोचविण्याच्या हालचाली चालविल्या आहेत.
पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आम आदमी पक्ष लोकांना आकर्षक वाटतील अशा घोषणांसह मतदारांमध्ये स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला काही भागांमध्ये सत्ताविरोधी भावनेला तोंड द्यावे लागत आहे. तर दगाफटका होण्याची शक्यताही फेटाळली जाऊ शकत नाही. काँग्रेस उमेदवार सतपाल ब्रह्मचारी यांना देखील निवडणुकीसाठी मोठी मेहनत करावी लागत आहे. पक्ष संघटनेतील नाराजांची मनधरणी करण्याचे सत्र अद्याप सुरू असल्याने याचा प्रभाव प्रचारावरही दिसून येतोय.
मदन कौशिक भाजप उमेदवार
बलस्थान
सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद, संबंध
पक्षाचा मोठा प्रभाव आणि मजबूत संघटन
मजबूत बूथ अन् पन्ना प्रमुख व्यवस्था
कमजोरी
काही भागांमध्ये सत्ताविरोधी भावना
दगाफटका होण्याची भीती
विकासकामांबद्दल ढिसाळपणा
सतपाल ब्रह्मचारी काँग्रेस उमेदवार
बलस्थान
स्वच्छ प्रतिमा आणि संत समुदायाचे प्रतिनिधित्व
सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, जनतेशी थेट जोडलेला, सहज उपलब्ध
विद्यमान आमदाराबद्दल अँटी इन्कम्बन्सी
कमजोरी
पक्ष संघटन सोबत नसणे
बूथ व्यवस्थापन प्रकरणी पकड कमुकवत
संघटनेत गटबाजीमुळे प्रचार मंदावला