राज्यात सर्व ठिकाणी थेट प्रक्षेपणाची सोय,मुख्यमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ या मोहिमेंतर्गत स्वयंपूर्ण मित्रांसह राज्यातील नगराध्यक्ष, सरपंच, पंचसदस्य तसेच अन्य जनतेशी शनिवार दि. 23 रोजी संवाद साधणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण राज्यात सर्व ठिकाणी दाखवण्याची सोय करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी दिली. जनतेने हा कार्यक्रम पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सदर मोहीम यापुढे निरंतर चालू रहाणार असून त्याचे चांगले परिणाम दिसू लागल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील या मोहिमेची दखल घेतली असून ते मोहिमेतील यशाची पोचपावती म्हणून जनतेचे अभिनंदन करणार आहेत. शनिवारी सकाळी 11 वा. हा संवाद होणार असून तो ग्रामीण शहरी भागात सर्वांना पहाता यावा म्हणून प्रत्येक पंचायत, पालिकेत व्यवस्था करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. गोवा खऱया अर्थाने या मोहिमेतून स्वयंपूर्ण होऊ लागला असून त्याचा लाभ कालांतराने सर्वाना होणार आहे. कृषी, मासेमारी, बागायती अशा विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण मित्रांनी चांगले काम केले असून 198 पंचायती व 14 पालिकांमधून स्वयंपूर्ण मित्र नेमण्यात आले आहत. कोरोना महामारी चालू असतानाही सदर मोहीम सरकारने गोव्यात यशस्वीपणे राबवून विविध क्षेत्रात विकास साधला. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या आणि अनेकांना त्याचा फायदा मिळवून देण्यात स्वयंपूर्ण मित्रांना यश आले. गेल्या 2 ऑक्टोबर 2020 पासून ही मोहीम सुरू झाली असून 2 ऑक्टोबर 2021 रोजी एक वर्ष संपले. त्याचा आढावा सरकारने घेतला असून मोदीजी घेणार आहेत. गोवा खऱया अर्थाने स्वयंपूर्ण व्हावा म्हणून मोहीम चालूच राहणार असल्याचे ते म्हणाले.