प्रतिनिधी/ पणजी :
गुरुवारी राजधानी पणजीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ माजली. महत्त्वाचे म्हणजे या कोरोनाबाधित इसमाचा निवासी पत्ता कुणालाच माहीत नसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. तो पणजी मार्केटमध्ये तावेर्न चालवित होता. गेले चार दिवस त्याने अनेकांना दारुची विक्री केली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पणजी महापालिकेने सोमवारपर्यंत पणजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गुरुवारी राज्यभरात आणखी 30 रुग्ण सापडले असून त्यामध्ये वास्को, मडगाव, कोरगाव, ताळगाव, चिंबल, कुळे, मलपण व अन्य भागातील बाधितांचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 350 वर पोहोचली आहे.
पणजीत कोरानाबाधित झालेला रुग्ण मार्केटमध्ये तावेर्न बार चालवित होता. हा इसम आपल्या गावी गोव्याबाहेर गेला होता. चार दिवसांपूर्वी तो गोव्यात आला. येताच त्याने बार उघडून साफसफाई सुरू केली. बार खुले होताच मासळी मार्केट तसेच पणजी मार्केटमधील त्याच्या रोजच्या ग्राहकांनी येणे सुरू केले. मागील तीन दिवस त्याने ग्राहकांना दारू विक्री केली. काल त्याला मोबाईलवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संदेश येताच त्याने पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण त्याने आपला निवासी पत्ता दिलेला नाही. चालवित असलेल्या तावेर्नचाच पत्ता दिला आहे. त्यामुळे आता पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
तो तावेर्नचालक कुणाकुणाच्या संपर्कात आली हेही कळायला मार्ग नाही. मनपाचे काही बिगरगोमंतकीय कामगार व मासळी कापणारे मार्केटमधील काही कामगार त्याच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्यामुळे आता मार्केट परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मनपाने पुढील चार दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली 350 वर
गुरुवारी राज्याच्या विविध भागात नव्याने 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 350 वर पोहोचली आहे. गोव्यात सध्या वेगाने कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. 30 पैकी 12 रुग्ण मांगोरहिलशी संबंधित आहेत. 3 रुग्ण बायणा, 1 धारबांदोडा, 3 रुग्ण मुंबईहून आले होते. उर्वरित रुग्ण विविध भागात सापडले आहेत.
चिंबलमध्ये सुरक्षा गार्डसह कुटुंबाला बाधा
आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी सांगितले की चिंबल येथे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पती, पत्नी व लहान मुलाला बाधा झाली आहे. पती हा वास्को येथे सुरक्षा गार्डचे काम करीत होता. चिंबल येथील लोकांची स्वॅब घेण्यात आली. चिंबलमधील काही कुटुंबे त्यांच्या संपर्कात आली होती. पणजीतील रुग्ण हा त्याचाच परिणाम असल्याचे नीला मोहनन यांनी सांगितले.
आतापर्यंत गोव्यात 24,071 लोक बाहेरून आले आहेत, तर 1,13,571 लोक गोव्यातून बाहेर गेले आहेत. बिहार, झारखंड, बंगाल, ओरिसा या ठिकाणी आता कामगारांना रेल्वेतून पाठविण्यात येणार आहे. उघडय़ावर थुंकणाऱया 9375 लोकांवर दंडात्मक कारवाई केली आहे, तर तोंडाला मास्क घातले नाही म्हणून 24499 लोकांविरोधात दंडात्मक कारवाई केल्याचे माहिती खात्याचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले.
गोव्यातूनही कोरोना पॉझिटिव्ह गायब
दिल्ली पोलिसांच्या रेकॉर्डनुसार गायब झालेली कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती गोव्यातूनही गायब झाली आहे. काल ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर ही व्यक्ती गायब झाली आहे. ही व्यक्ती रेल्वेतून गोव्यात आली होती व त्याची स्वाईब चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पोलीस त्याच्या शोधात आहेत. त्याने दिलेल्या पत्त्यावर तो सापडलेला नाही. मोबाईल कॉल ट्रेसिंगनुसार ही व्यक्ती दिल्लीची आहे व दिल्ली पोलिसात त्याची नोंद हरवला असल्याची केली आहे, असे नीला मोहनन यांनी स्पष्ट केले.
पणजी मार्केट आजपासून लॉकडाऊन भाजीविक्रेती, तावेर्नवाला सापडला पॉझिटिव्ह
पणजी : पणजी मार्केटजवळ असलेल्या पारंपरिक बारचा बारचालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला कळताच तो गायब झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाल्याने खळबळ माजली आहे. पोलीस त्याचा कसून तपास करीत आहेत. बारचालकाने अनेक कामगारांना गेल्या तीन दिवसांपासून बेकायदेशीर मद्य विकले होते. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आजपासून चार दिवस पणजी मार्केट, मासळी, मटण बाजार बंद ठेवला जाणार असल्याची माहिती महापार उदय मडकईकर यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार कुठपर्यंत झाला याची तपासणी करण्यासाठी 44 कामगारांची कोरोना चाचणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजीविक्रेती महिलाही कोरोनबाधित
गुरुवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापौर उदय मडकईकर बोलत होते. त्यांच्यासोबत उपमहापौर वसंत आगशीकर, बाजार समिती प्रमुख शेखर डेगवेकर उपस्थित होते. आपल्याला कोरानाधित संशयितांची नावे मिळालेली असून त्यात भाजी विक्रेत्या महिलेचाही समावेश आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मार्केट लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापौर म्हणाले.
कोरोनाबाधित बारचालक गायब
पणजी मार्केट परिसरात असलेला एक बार परप्रांतीय माणूस भाडय़ाने चालवत होता, तो कोरोनाबाधित आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी गेलेला तो बारचालक चार दिवसापूर्वी पणजीत आला होता. त्याच्याकडे येणाऱया रोजच्या ग्राहकांना त्यांने मद्याची विक्री केली होती. सध्य़ा तो गायब आहे. त्याचा पत्ता कुणाकडेच नाही. त्यांने नोंदणी करताना ज्या बारचा पत्ता दिला ते बारही सध्या बंद असून त्याचा मोबाईल फोनही बंद आहे.
रोजंदारी कर्मचाऱयांना सात दिवसांची सुट्टी
रोजंदारीवर काम करणाऱया मनपाच्या 61 कर्मचाऱयांना 7 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. या काळात त्यांनी तापसणी करून घ्यावी असेही त्यांना सांगण्यात आले आहे. पूर्ण मनपा इमारत सॅनिटाईझ करण्यात येणार आहे.
मडगाव कोविड हॉस्पिटलातीलकर्मचाऱयाचे कुटुंबही पॉझिटिव्ह
मडगाव:
मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये चहा-नाश्ता व जेवण पुरविण्याचे काम करणारा कर्मचारी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर त्याची दोन मुले व पत्नीची स्वॅब चाचणी घेण्यात आली असता, ते देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोविड हॉस्पिटलाचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सद्या बराच गोंधळ माजला आहे. काल त्याचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, येथील कर्मचारी घाबरले आहेत. या कर्मचाऱयाच्या संपर्कात असलेल्या सर्वांची आज शुक्रवारी चाचणी केली जाणार आहे. हा कर्मचारी ईएसआय हॉस्पिटलमध्ये ड्रेसर म्हणून रूजू झाला होता. पण, सद्या तो कॅन्टीनमध्ये कार्यरत होता. कोविड हॉस्पिटलातील इतर कर्मचारी तसेच नर्सेस व डॉक्टर यांना चहा-नाश्ता तसेच जेवण पुरविण्याचे काम करीत होता. त्यामुळे सर्वजण सद्या तणावाखाली आले आहेत. तो ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये आपल्या कुटूंबासोबत राहतो. या कर्मचाऱयाचा थेट कोरोनाबाधितांशी संपर्क येत नव्हता, तरीसुद्धा तो पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा कर्मचारी अन्य कुणाच्या संपर्कात आला होता का याची चौकशी होणे महत्वाचे बनले आहे.
धर्मगुरू निघाले पॉझिटिव्ह
वास्को येथील एक धर्मगुरू पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांना काल गुरूवारी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काल दिवसभर कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण पाच सिम्प्टोमेटिक रूग्ण दाखल झाले असून या ठिकाणी उपचार घेणाऱयांची संख्या 164 पोचली आहे.