दीड महिन्यापूर्वीच्या काणकोण खून प्रकरणाचा झाला उलगडा
प्रतिनिधी/ मडगाव
दुपटृयाच्या साहाय्याने आपल्याच पत्नीचा खून करुन व नंतर फरारी झालेल्या मूळ बिहारातील खगारिया जिल्ह्य़ातील अजय उर्फ गुलझारिया मल्ली या आरोपीला गोवा पोलिसानी शनिवारी त्या राज्यात जाऊन जेरबंद केले. या आरोपीला आज वा उद्या गोव्यात आणले जाणार आह.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिसेक धनिया यांनी ही माहिती दिली.
19 एप्रिल 2022 रोजी गुळे -काणकोण येथील प्राथमीक विद्यालयाजवळील वन खात्याच्या कार्यालयाजवळ 30 ते 40 वर्षीय एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाची सरकारी डॉक्टरांनी चिकीत्सा केली तेव्हा दुपटृयाच्या साहाय्याने गळा आवळून या महिलेचा खून केलेला असल्याची माहिती उघड झाली.
तपास यंत्रणेच्या चौकशीत असे दिसून आले की ज्या दिवशी ही खुनाची घटना घडलेली आहे त्या दिवसापासून या महेलेचा पती गायब झालेला आहे. मूळ बिहारातील व सध्या मडगाव रेल्वे स्थानकासमोर राहात असलेल्या अजय मल्ली याच्या शोधार्थ पोलीस मडगावात गेले तेव्हा अजय मल्ली गायब झाला होता आणि त्यामुळेच संशयाची सुई त्याच्या दिशने फिरकू लागली होती.
या आरोपीला पकडण्यासाठी दक्षिण गोवा पोलिसांनी अनेक पथके तयार केली आणि प्रत्येक पथकावर जबाबदारी सोपविण्यात आली. प्रत्येक पथक आपल्या परीने काम करीत होते. तपासात असेही आढळून आले की मयत मल्ली ही आपल्या पतीबरोबर मडगावात राहात होती आणि कामगार म्हणून काम करीत होती. अनैतिक संबंध असावेत या संशयावरुन तिच्या पतीने तिचा खून केला असावा या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले होते.
परप्रांतिय लोक मडगाव व आसपासच्या भागात कोठे असतात तेथील वस्ती, रेल्वे स्थानक, बस स्थानक व इतर संभाव्य जागे तपास यंत्रणेने तपासले तेव्हा आरोपी काही पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
त्यामुळे कदाचित तो आपल्या गावी गेला असावा असा तर्क काढून एक पथक बिहारमध्ये पाठविण्यात आले होते. गेले 20 दिवस हे पथक बिहार राज्यातील खगारिया जिल्ह्यात आरोपीच्या पाळतीवर वास्तव्यास होते. त्या जिल्ह्यातील पोलिसांच्या साहाय्याने तसेच स्थानिक माहितीच्या आधारे अखेर या फरारी आरोपीला तपास यंत्रणेने शनिवारी जेरबंद केले. आरोपीला गोव्याला आणण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी दिली.
पोलीस प्रमुखाकडून बक्षिस
सुरुवातीला या खून प्रकरणासंबंधी कोणताच धागा तपास यंत्रणेकडे नव्हता. मात्र, एकेक माहिती मिळवत मिळवत पोलिसांनी मयताची ओळख पटविली आणि नंतरच आरो2पी कोण याचा अंदाज बांधता आला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या या खून प्रकरणाचा उलगडा केल्यामुळे गोव्याच्या पोलीस प्रमुखांनी काणकोण पोलीस पथकाला बक्षिस जाहीर केलेले आहे.