शहर-ग्रामीण भागात जागृती बैठका, सीमावासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कन्नड सक्तीविरोधात 1 जून 1986 रोजी हिंडलगा, बेळगुंदी व बेळगाव परिसरात आंदोलन झाले. आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बेछुट गोळीबारात 9 सीमावासियांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना प्रत्येक वषी सीमावासीय अभिवादन करतात. 1 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे आदरांजली वाहिली जाणार आहे. यावेळी सीमावासियांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, यासाठी शहर तसेच ग्रामीण भागात जागृती केली जात आहे.
मध्यवर्ती म. ए. समिती, शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समिती, युवा आघाडी यांच्यावतीने गल्लोगल्ली, गावोगावी जाऊन हुतात्मा दिनाची जागृती केली जात आहे. तालुका म. ए. समितीने झाडशहापूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, देसूर, वाघवडे, किणये, बेळगुंदी या परिसरात जागृती बैठका घेऊन सीमावासियांना हुतात्मा दिनासोबत सीमाप्रश्नाचा खटला व मराठा कागदपत्रांसाठीची लढाई याविषयी मार्गदर्शन केले जात आहे.
शहर समितीची उद्या बैठक
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत हुतात्मा दिन, भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्न, जिल्हाधिकाऱयांना द्यावयाचे निवेदन याविषयी चर्चा केली जाणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन शहर समितीतर्फे करण्यात आले आहे.
महिला आघाडीचे आवाहन
1 जून कन्नड सक्तीविरोधातील आंदोलनात कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बेछुट गोळीबार केला. यामध्ये अनेक जण हुतात्मा झाले. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवार दि. 1 रोजी सकाळी 9 वाजता सर्व सदस्यांनी हिंडलगा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, म. ए. समिती महिला आघाडी दक्षिण विभाग प्रमुख, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, माजी महापौर सरिता पाटील, प्रिया कुडची, अर्चना देसाई, भाग्यश्री जाधव, माला जाधव, श्रद्धा मंडोळकर, राजश्री बाबुळकर, मंजुश्री कोलेकर, राजश्री बडमंजी यांसह इतरांनी केले आहे.
युवा समितीची आज बैठक
1 जून हुतात्मा दिन आणि इतर विषयांसाठी म. ए. युवा समितीतर्फे रविवार दि. 29 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता कावळे हॉस्टेल, टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात बैठक होणार आहे. यावेळी सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मण्णूर येथे आज जागृती बैठक
हुतात्मा दिनाच्या जागृतीसाठी रविवार दि. 29 रोजी सायंकाळी 7 वाजता जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी चौक, मण्णूर येथील समुदाय भवनात बैठक होणार आहे. यावेळी आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, हिंडलगा परिसरातील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.