प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील लोकवेदाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार तसेच गोवा कला अकादमीचे माजी सदस्य सचिव विनायक विष्णू खेडेकर यांना नुकताचा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून त्यानिमित्त त्यांची विशेष मुलाखत उद्या शुक्रवार दि. 19 रोजी सायंकाळी 5.05 वाजता गोवा दूरदर्शनवरुन प्रसारित करण्यात येणार आहे.
विनायक खेडेकर या बहुआयामी व्यक्तीमत्वाचे विविध पैलू, त्यांची लोकवेद अभ्यासक म्हणून प्रदीर्घ कारकीर्द, त्यांचे अनुभव, त्यांची मते या सर्वांचे दर्शन घडविणारी ही मुलाखत पत्रकार राजू भिकारो नाईक यांनी घेतली आहे. त्यात त्यांनी गोव्याची खरी संस्कृती, लोकवेदाचे जतन-संवर्धन-आधुनिकीकरण, लोकवेदांमुळे त्यांनी केलेली विदेश भ्रमंती, त्यांचे ग्रंथलेखन, प्रबंध सादरीकरण, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आरेखन, नियोजन व आयोजनातील त्यांचा अनुभव, गोव्यातील युवा पिढी, संशोधनात्मक क्षेत्रात कार्य करणाऱया नव्या पिढीबद्धलचे त्यांचे आकलन, सांस्कृतिक जीवन म्हणजे काय, अशा अनेक अंगानी खेडेकर यांनी या मुलाखतीत दिलखुलास संवाद साधला आहे. दूरदर्शनचे निर्माते राजेंद्र नरसिंह फडते यांनी निर्मिती केली आहे. ही मुलाखत तासभर चालणार आहे.