-तरुण भारतच्या वृत्तानंतर तांत्रिकी कर्मचाऱयांस डच्चू
प्रतिनिधी / कोल्हापूर
पन्हाळा पुरवठा विभागातील भ्रष्ट काराभाराचे तहसिलदार रमेश शेंडगे यांनी तत्काळ ‘सॅनिटायझेशन’ केले आहे. ‘पन्हाळा पुरवठामध्ये भ्रष्टाचाराचा अरुणोदय’ या मथळ्याखाली 20 एप्रिल रोजी तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत शेंडगे यांनी पुरवठा विभागाच्या कारभाराला चांगलीच शिस्त लावली आहे. संबंधित तालुका पुरवठा निरीक्षकास कानपिचक्या देऊन कामकाजात सुधारणा करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर अर्थपूर्ण कारभार करणाऱया तांत्रिकी कर्मचाऱयास डच्चू दिला आहे.
पन्हाळा पुरवठा विभागातील मनमानी कारभाराबाबत तालुक्यातील अनेक रेशन दुकानदारांच्या तक्रारी होत्या. नवीन रेशन दुकान मंजूर झाल्यानंतर जुन्या दुकानातील रेशनकार्डे नव्या दुकानाकडे वर्ग करण्यासाठी आणि त्याचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यासाठी हजारो रुपयांची मागणी केल्याची चर्चाही दुकानदारांमध्ये दबक्या आवाजात सुरु होती. यापैकी अनेक रेशन दुकानदार ‘तरुण भारत’कडे येऊन व्यक्त झाले. त्यांनी आपली व्यथा मांडली. विविध कामे जाणिवपूर्वक प्रलंबित ठेऊन पैसे उकळले जात असल्याचे काहींनी सांगितले. तर रेशनकार्डला आधारकार्ड लिंक नसल्यामुळे (ऑनलाईन नोंद) मोफत तांदूळ वाटपादरम्यान नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे गालत असल्याचे अनेकांनी सांगितले.
प्राधान्य शिक्षापत्रिकेवर इसम संख्या दहा असली तरी ऑनलाईन नोंदीअभावी प्रशासनाकडून धान्य मात्र 6 ते 7 व्यक्तींचे मिळते. ही चूक पुरवठा विभागाची असली तरी शिक्षा मात्र रेशन दुकानदारांना भोगावी लागत आहे. येथील तांत्रिकी कर्मचाऱयाकडून तालुका पुरवठा निरिक्षकांनाच अर्थार्जनाचे धडे शिकवले जात असल्यामुळे त्याच्या इशाऱयावरच येथील कारभार सुरु होता. ‘तरुण भारत’ने आपल्या वृत्तातून याबाबत सडोतोड भूमिका मांडून भ्रष्ट कारभाराचा पंचनामा केला. त्याची गंभीर दखल घेत तहसिलदार रमेश शेंडगे यांनी वृत्त प्रसिद्ध झालेल्या दिवशीच तांत्रिकी कर्मचाऱयास कामावरून कमी केले. तर रेशन दुकानदारांना वेठीस न धारता पारदर्शी कारभार करा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना पुरवठा निरिक्षकास दिल्या.
नवीन दुकानाच्या रेशनकार्डाची नोंद तत्काळ पूर्ण
पन्हाळा तालुक्यात गेल्या वर्षभरात सुमारे पाच ते सहा नवीन रेशन दुकाने मंजूर झाली आहेत. त्यामुळे जुन्या दुकानातील रेशनकार्डांची नोंद कमी करून नव्या दुकानाच्या पॉस मशिनवर ऑनलाईन पद्धतीने नोंदीत करणे आवश्यक असते. पण एक रेशनकार्डाची नोंद कमी करून त्याची नव्या दुकानाकडे नोंद करण्यासाठी प्रतिकार्डास सुमारे 100 ते 200 रूपयांचा दर निश्चित केल्याची रेशन दुकानदारांची तक्रार होती. हा दर मिळाला नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱयाने काही नव्या दुकानाकडे केवळ 5 ते 10 कार्डांची ऑनलाईन नोंद करून उर्वरित सर्व शिधापत्रिका अद्याप जुन्या दुकानाकडेच ठेवल्या होत्या. पण ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर नव्या दुकानांकडे रेशनकार्डांची नोंद जलद गतीने करण्यात आली. तर काही नवीन दुकानांना पॉस मशिन देऊन पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.
सात सर्कलमधील महा-ई सेवा केद्रांना ऑनलाईन नोंदीचे अधिकार
रेशनकार्डला आधारकार्ड लिंक नसल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांना नोंदीत इसमसंख्येप्रमाणे धान्य मिळत नाही. परिणामी रेशन दुकानदार आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. तरुण भारतच्या वृत्तानंतर तहसीलदार शेंडगे यांनी याबाबत चौकशी केली असता आधार लिंक करण्याचे काम मोठय़ा प्रमाणात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तालुक्यातील सात सर्कलमधील महा-ई केंद्रांकडे दिली असल्याचे तहसिलदार शेंडगे यांनी सांगितले.