देवगड येथे पहिल्यांदाच मोठय़ा दंडात्मक रकमेची कारवाई
वार्ताहर / देवगड:
महाराष्ट्र राज्यात मासेमारीच्या सागरी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच मासेमारी करण्याच्या क्षेत्राच्या हद्दीचे उल्लंघन केल्याप्रकरणी उडपी (कर्नाटक) येथील जयमाता नौकेच्या मालकावर 8 लाख 6 हजार 935 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. देवगड तालुक्यात परप्रांतीय नौकेवर मोठय़ा रकमेची दंडात्मक कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
उडपी येथील श्रीमती प्रजना रमेश कर्केजा यांच्या मालकीची यांत्रिक नौका जयमाता (आयएनडी केए 02 – एमएम – 4583) ही तालुक्यातील तारामुंबरी-मिठमुंबरी किनाऱयासमोरील सागरी क्षेत्रात 19 वावामध्ये मासेमारी करताना देवगड मत्स्य विभागाच्या पथकाला आढळून आली. ही घटना 17 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते 9.10 या दरम्यान घडली. या नौकेचा ताबा घेत नौका देवगड बंदरात आणण्यात आली होती. या नौकेवरील 1 लाख 61 हजार 387 रुपयांच्या मासळीचा लिलाव करण्यात आला. 4 मे 2021 रोजी देवगड तहसीलदार एस. व्ही. गवस यांच्यासमोरील सुनावणीत महाराष्ट्र सागरी अधिनियमानुसार पहिल्यांदा प्राप्त मासळीच्या लिलावाच्या रकमेच्या तीनपट व परराज्यातील मासेमारी क्षेत्राच्या सागरी हद्दीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचपटाचा दंड म्हणून 8 लाख 6 हजार 935 रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली.