आर्लेम जंक्शन प्राणघातक हल्ला प्रकरणी न्याया.चा आदेश
प्रतिनिधी /मडगाव
आर्लेम जंक्शनजवळ अ. शेख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणातील कालापूर – तिसवाडी येथील संशयित आरोपी इम्रान बेपारी (32) व केपे परिसरातील वसंत उर्फ अमीर गवंडे (38) याना न्यायालयाच्या परवानगीविना गोव्याबाहेर न जाण्याचा आदेश देताना इतर अनेक अटी घालून जामिनावर सोडण्याचा काल मंगळवारी न्यायालयाने आदेश दिला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विन्सन डिसिल्वा यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील डी. कोरगावकर तर संशयिताच्यावतीने ऍड. के. व्हिएगश यांनी काम पाहिले.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार संशयित आरोपी वसंत गवंडे याने न्यायालयाच्या निदर्शनाला असे आणून दिले की आपण मूळ गोव्याचा असून पोलिसांनी आपल्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 148, 307, 120-ब, 212 कलमाखाली तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद केलेला आहे. सध्या आपण न्यायालयीन कोठडीत आहे. अटी घालून जामिनावर सोडण्यात यावे.
न्या. डिसिल्वा यांच्या न्यायालयात पोलिसांच्यावतीने सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना आर्लेम जंक्शन येथे या प्रकरणातील संशयितांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी कोयता, लोखंडी सळी व बंदुकीचा वापर करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. कट कारस्थान करुन प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे सरकारपक्षाने न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले.
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी वसंत गवंडे व संशयित आारेपी इम्रान बेपारी याना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वयैक्तीक बॉण्डवर व तितक्याच रकमेच्या हमीवर जामिनावर सोडण्याचा आदेश देताना या प्रकरणातील पुराव्याकडे ढवळाढवळ करता कामा नये, या न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाता कामा नये, निवासी पत्ता सादर करण्यात यावा असे न्या. डिसिल्वा यांनी दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे.