कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया बससेवेवर परिणाम; महसूलही थंडावला; सीमा हद्दीवर कोरोना चाचणी सक्तीची
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील निपाणी, संकेश्वर, चिकोडी आणि बेळगाव विभागाला याचा मोठा फटका बसत आहे. बेळगाव विभागाचा 40 टक्के महसूल हा महाराष्ट्रात धावणाऱया बसमधून जमा होत असतो. मात्र, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. साहजिकच प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसात बेळगाव विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव महाराष्ट्रात आणि फटका कर्नाटकाला, असे चित्र दिसत आहे.
गेल्या आठ दिवसात बेळगाव विभागाला 18 ते 20 लाखांचे नुकसान सोसावे लागले आहे. गतवषी कोरोनामुळे परिवहनला तब्बल 110 कोटींचा फटका बसला होता. त्यात आता आणखी भर पडत आहे. बेळगाव विभागातून महाराष्ट्रात दररोज धावणाऱया बसमधून 7 ते 8 लाखांचा महसूल मिळतो. मात्र, आता तो 3 लाखांच्या खाली आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे बेळगाव विभागाच्या महसुलावर पाणी फेरले आहे. सीमा हद्दीवर कोरोना चाचणी सक्तीची केल्याने प्रवाशांची संख्या थंडावली आहे. याचा परिणाम परिवहनच्या उत्पन्नावर झाला आहे. राज्यात कोरोनामुळे गतवषी तब्बल सहा महिन्यांहून बससेवा ठप्प होती. दरम्यान, परिवहनला मोठा फटका बसला होता. कर्मचाऱयांचे वेतन देणेही मुश्कील बनले होते. दरम्यान, परिवहनच्या मदतीसाठी राज्य सरकार धावून आले होते. अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत होता. मात्र, पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने प्रवाशांची संख्या रोडावली आहे. परिवहन झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. याकरिता नुकतेच कुरियर सेवेलाही प्रारंभ केले आहे. शिवाय बेळगाव विभागाने उत्पन्न वाढीसाठी आरटीओ सर्कल येथे असलेल्या कार्यालयासमोर व्यावसायिक गाळे उभे केले आहेत. परिवहन अनेक तऱहेने महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करत असले तरी कोरोनाचा फटका परिवहनला बसताना दिसत आहे.