एमपीटीचे अध्यक्ष डॉ. ई. रमेशकुमार
प्रतिनिधी/ वास्को
एमपीटीच्या माध्यमांतून गोव्यात रोप वे, रोरो, फेरी सेवा, आंतरराष्ट्रीय व देशी क्रूज टर्मिनल अशा विविध सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न जारी असून गोव्याला पर्यटन विकासाच्या दृष्टीने या सेवांचा भरीव लाभ होणार आहे. केंद्रीयमंत्री मानसुख मंदाविया यांच्याकडूनही या विकासासाठी योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे एमपीटीचे अध्यक्ष डॉ. ई. रमेशकुमार यांनी म्हटले आहे.
सोमवारी मुरगाव बंदरात माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना एमपीटीचे अध्यक्ष डॉ. ई. रमेशकुमार यांनी एमपीटीकडे मोठय़ा संख्येने कामगार तसेच निवृत्त कामगार असून बंदराचा योग्य विकास करण्यासाठी एमपीटी प्रयत्नशील आहे. कोळसा वाहतुकीचा प्रश्न वरीष्ठ पातळीवर हाताळला जात असून कोळशा हाताळणीचे प्रमाण किती असेल याबाबत निश्चित माहिती उपलब्ध झाल्यावरच जनतेसमोर ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच एमपीटीकडे मालवाहतुकीचे अन्य पर्याय असून या पर्यायांवर सतत विचार करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे पर्यावरण विषयक प्रश्न हाताळण्यासाठी एमपीटी दक्ष आहे. बंदरातील व्यवहार स्वच्छ आणि सरळ राहावा यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे. बंदराच्या विकासासाठी एमपीटी सतत कार्यरत आहे असे ते म्हणाले.
मुरगाव बंदराच्या माध्यमातून गोव्यात रोरो सेवा, फेरी सेवा, रोप वे, आंतरराष्ट्रीय व देशी प्रुज सेवा असे उपक्रम सुरू करण्याचेही प्रयत्न जारी आहेत. केंद्रीय जहाजोद्योग मंत्री मनसुख मंदावीया यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडे रोज या विषयावर चर्चा होत आहे. त्यामुळे गोव्यात विविध सेवा सुरू करण्याच्या विचार लवकरच प्रत्यक्षात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटनाच्या दृष्टीने याचा गोव्याला भरपूर लाभ होईल असे ते म्हणाले. कोरोना काळातही एमपीटीने माल हाताळणीत समाधानकारक कामगीरी बजावल्याची माहिती त्यांनी दिली.