टॉवर रद्द करण्याचा सरपंच हनुमंत नाईक यांचे ग्रामस्थांना आश्वासन
प्रतिनिधी/ म्हापसा
आसगाव पंचायत क्षेत्रातील एक नागरिक सुरेश मोरजकर यांनी घर दुरुस्तीसाठी परवाना घेऊन त्या जागी तीन मजली इमारत उभारून त्या इमारतीच्या छप्परावर पंचायतीच्या परवानगीशिवाय मोबाईल मनोरा (टॉवर) उभारल्याने या टॉवरला आसगावातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला असून सोमवारी सकाळी गावातील सुमारे 200 नागरिक एकत्रित येऊन त्यांनी या टॉवरला तीव्र विरोध केला. हा मोबाईल टॉवर त्वरित काढावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी सरपंचाकडे केली.
ग्रामस्थांच्या मागणीवरून आसगावचे सरपंच हनुमंत नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत मंडळासमवेत या मोबाईल टॉवरविषयी इन्स्पेक्शन ठेवले होते. यावेळी सरपंच सचिवांनी या टॉवरची पाहणी करून तपासणी केली. यावेळी सरपंच हनुमंत नाईक म्हणाले की, सुरेश मोरजकर यांनी टॉवर घालण्यास सुरुवात केली आहे. याबाबत ग्रामस्थांची तक्रार आल्यावर आम्ही याकडे लक्ष घातले आहे. 30 तारीखला मोरजकर यांना काम बंद करण्याची नोटीस बजावली.
आज आम्ही तपासणी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जमलो आहोत. पण त्यांचे घर बंद होते. सचिवांनी त्यांना फोन केला असता ते फोन उचलत नाही. कायद्याप्रमाणे याची तपासणी टॉवर हायट घेतली आहे व पंचनामा तयार केला आहे आता त्यांना कायद्यानुसार कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. सरकारने अधिसूचना जारी केली आहे की आम्हाला टॉवर पाहिजे मात्र यापुढे ते रानात उभारावे असे सरपंच नाईक म्हणाले. पंचायतीने त्यांना परवानगी दिली नाही. 30 तारखेला आम्ही काम बंद करण्याची नोटीस बजावली. 31 तारखेला मोठय़ा प्रमाणात काम केले व नंतर पोलीस बोलावून हे काम बंद पाडले असे सरपंच म्हणाले. गावचा यास ठाम विरोध असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.