सुवेंदु अधिकारी यांच्या बंधूंसह पाच हजार समर्थकांचा पक्षप्रवेश : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालचे माजी परिवहन मंत्री सुवेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेले काही दिवस तृणमूलमधील विविध नेते भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर शुक्रवारी तृणमूलचे बडे नेते आणि सुवेंदु यांचे बंधू सौमेंदु अधिकारी यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांनी भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश केला. 5,000 हून अधिक समर्थकांसह सौमेंदु अधिकारी भाजपात दाखल झाल्याने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पूर्व मिदनापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना सुवेंदु अधिकारी यांनी समर्थकांच्या भाजपप्रवेशाचा ‘बॉम्ब’ फोडाला होता. माझा भाऊ सौमेंदु याने तृणमूल काँग्रेसमध्ये केलेल्या कामाची योग्य ती दखल घेतली जात नसल्याने तो असमाधानी आहे. म्हणूनच सौमेंदु आपल्या पाच हजारहून अधिक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. त्यांनी दिलेल्या संकेतांनुसार कोंटाई येथे सायंकाळी सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला.