प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. पहिले रेल्वेगेटनजीक शनिवारपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. विकेंड कर्फ्यू असल्यामुळे याकाळात नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने दुपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे.
मिरज ते लोंढा या दरम्यान दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. यातील एक टप्पा असणाऱया बेळगाव ते खानापूरपर्यंत काम हाती घेण्यात आले आहे. टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट येथे मागील आठवडय़ात कामाला सुरुवात करण्यात आली. जुना ट्रक सरकविणे, नवीन ट्रक घालून खडीकरण करणे ही कामे हाती घेण्यात आली होती. पाच ते सहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वेगेट खुले करण्यात आले होते. परंतु अद्यापही काही काम अर्धवट असल्याने शनिवारपासून पुन्हा एकदा येथील कामाला सुरुवात करण्यात आली.
रेल्वेगेट बंद असल्याने पादचाऱयांसह वाहनचालकांना दुसरे अथवा तिसरे रेल्वेगेटचा वापर करावा लागत आहे. दुचाकी व चारचाकी वाहने दुसऱया रेल्वेगेटमार्गे वळविण्यात आली आहेत. शनिवारी सकाळपासून जेसीबीच्या साहाय्याने खडी घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यानंतर मागील आठवडय़ातील उर्वरित ट्रक घालण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत पहिले रेल्वेगेट बंद राहणार आहे.