प्रतिनिधी /बेंगळूर
2021-22 च्या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी मंगळवारी पहिल्या टप्प्यात पात्र 4,755 मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच या मुलांना शाळेत दाखल होण्याची शेवटची तारीख 9 जुलै आहे. याबाबत सार्वजनिक शिक्षण खात्याच्या सचिवांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. अनुदानित आणि अनुदानरहित शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पात्र 11,531 विद्यार्थ्यांची लॉटरी प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार 4,755 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे प्रवेशसंबंधी माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक पालकांनी 25 जूनपासून 9 जुलैपर्यंत संबंधित शाळेत जागा वाटपाची प्रत घेऊन भेट देत शाळेत प्रवेश घ्यावा. याबाबत अधिक माहितीसाठी खात्याच्या www.schooleducation.kar.nic.in या वेबसाईटवर भेट देण्याची सूचना केली आहे.