वृत्तसंस्था/ डर्बी
पाकचा क्रिकेटपटू खुशदील शहा याच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाचे हाड मोडल्याने तो आता सुमारे तीन आठवडय़ाच्या कालावधीसाठी क्रिकेटपासून अलिप्त राहणार असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले.
डर्बी येथे शनिवारी सराव सत्रात फलंदाजी करत असताना त्याला ही दुखापत झाली. पाकचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर असून त्यांचा या दौऱयावरील दुसरा चार दिवसांचा सरावाचा सामना 24 ते 27 जुलै दरम्यान होणार आहे. या सराव सामन्यात खुशदील शहा सहभागी होवू शकणार नाही. पाकचा संघ इंग्लंडच्या दौऱयात तीन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. उभय संघातील पहिली कसोटी 5 ऑगस्टपासून ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर खेळविली जाईल.