उमर शरीफ यांचे कर्करोगामुळे निधन – जर्मनीत घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ बर्लिन
पाकिस्तान समवेत भारताला स्वतःच्या उत्तम विनोदशैलीद्वारे हसविणारे किंग ऑफ कॉमेडी उमर शरीफ यांचे शनिवारी निधन झाले आहे. 66 वर्षीय विनोदवीर कर्करोगाशी लढत होते. त्यांना उपचारासाठी एअर ऍम्ब्युलन्सद्वारे कराची येथून वॉशिंग्टन येथे नेण्यात आले होते. पण प्रकृती बिघडल्याने जर्मनीत इमर्जन्सी लँडिंग करविण्यात आले होते.
उमर शरीफ हे एअर ऍम्ब्युलनसमधून पत्नी जरीन गजलसोबत अमेरिकेसाठी प्रवास करत होत. पण प्रकृती बिघडल्याने बुधवारी त्यांना जर्मनीच्या नूर्मबर्ग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून तीन दिवसांनी त्यांना अमेरिकेत पाठविण्यात येणार होते, पण तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले आहे.
10 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी सूत्रसंचालक वसीम बादामी यांनी उमर यांची एक चित्रफित प्रसारित करत पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे त्यांच्यावर उपचार करविण्यासाठी मदत मागितली होती. भारतीय गायक दलेर मेहंदी यांनीही इम्रान यांना आवाहन केले होते. 11 सप्टेंबर रोजी पाक सरकारने एक वैद्यकीय पथक स्थापन केले होते. या पथकाने उमर यांना उपचारासाठी विदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला होता. 16 सप्टेंबरला त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळाल होता. उपचारासाठी सिंध सरकारने 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
उमर शरीफ यांनी भारतातील लोकप्रिय कॉमेडी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये अतिथी परीक्ष म्हणून भाग घेतला होता. वयाच्या 14 व्या वर्षापासून कॉमेडी करणारे उमर शरीफ 1989 च्या कॉमेडी स्टेज प्ले ‘बकरा-किश्तों में’ आणि ‘बुड्ढा घर पर है’ मध्ये दिसून आले होते. या कार्यक्रमांना भारतातही मोठी पसंती मिळाली होती. याचबरोबर त्यांचा ‘द शरीफ शो’ देखील अत्यंत लोकप्रिय ठरला होता.