इस्लामाबाद
: पाकिस्तानचे सरकार जागतिक व्यासपीठांवर काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याची कुठलीच संधी दवडत नाही. परंतु इम्रान खान सरकारच्या मंत्रिमंडळात या मुद्दय़ावर एकमत नाही. इम्रान सरकारमध्ये प्रभावशाली असलेल्या मानवाधिकार मंत्री शीरीन मजारी यांनी तेथील विदेश मंत्रालयावर टीकेची झोड उठविली आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्रालय कुचकामी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मजारी यांची ही टिप्पणी राजकीय दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्त्वाची आहे. विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी हे सैन्याच्या पसंतीचे मंत्री असल्याचे मानले जाते. मागील महिन्यातच कुरैशी हे पुढील पंतप्रधान होऊ शकतात असा कयास वर्तविला जात होता.
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने पंतप्रधान इम्रान खान यांनाच तोंडघशी पाडले आहे. इम्रान यांना विदेश मंत्रालयाकडून कुठलीच साथ मिळत नसल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे उद्गार मजारी यांनी जाहीर कार्यक्रमाला संबोधित करताना काढले आहेत. .
पाकिस्तानचे मुत्सद्दी आलिशान हॉटेल्समध्ये ऐशोआराम करत आहेत. मोबाइलवर गप्पा मारण्यातच त्यांचा वेळ खर्ची पडतो. पाकिस्तानपेक्षा छोटा तसेच गरीब असलेला बुर्किना फासो हा देश चांगला आहे. तेथील मुत्सद्दी काम करतात अशी खोचक टिप्पणी मजारी यांनी केली आहे. शीरीन मजारी यांना इम्रान यांच्या वर्तुळातील नेत्या मानले जाते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा एक गट विदेशमंत्री कुरैशी यांना पुढील पंतप्रधान ठरवत आहे. सैन्याचेही कुरैशी यांनाच समर्थन असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर मजारी यांची ही टिप्पणी महत्त्वाची मानावी लागणार आहे. इम्रान आणि कुरैशी यांच्यातील संबंध काही काळापासून बिघडले आहेत. सौदी अरेबियाप्रकरणी कुरैशी यांना पाकिस्तानची चांगलीच फजिती केली आहे.