दौऱयाच्या महिन्यानंतरही सौदी अरेबियाने दिले नाही कर्ज
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानची सौदी अरेबियाने एकप्रकारे थट्टा केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सौदी अरेबिया दौऱयाला महिन्याहून अधिक काळ लोटल्यावरही आश्वासनानुसार पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सचे कर्ज आणि 1.2 अब्ज डॉलर्सचे उधारीवर कच्चे तेल मिळालेले नाही. युवराज मोहम्मन बिन सलमान चालू आठवडय़ात पाकिस्तानला कर्ज उपलब्ध करतील अशी अपेक्षा आता पाकचे मंत्री फवाद चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी सैन्य आणि सरकारच्या भीतीने तेथील प्रसारमाध्यमे याप्रकरणी उघड टिप्पणी करणे टाळत आहेत. पण काही मुक्त पत्रकार यातील फोलपणा उघड करत आहेत. इम्रान हे 23-26 ऑक्टोबरपर्यंत सौदीच्या दौऱयावर होते. या तीन दिवसांमध्ये कुठल्याही कराराबद्दल दोन्ही देशांकडून वक्तव्य करण्यात आले नव्हते.
इम्रान मायदेशी परतल्याच्या 6 दिवसांनी सौदी अरेबियाने पाकला एकूण 5 अब्ज डॉलर्सचे सशर्त कर्ज देणार असल्याचे जाहीर केले होते. सर्वसाधारणपणे सौदी सरकार घोषणेच्या 3-5 दिवसांमध्ये धनादेश प्रदान करते, पण यावेळी महिन्यापेक्षा अधिक काळ लोटल्यावरही कुठलीच हालचाल करण्यात आलेली नाही.
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार
सौदी अरेबियाने चालू आठवडय़ात कर्जाची रक्कम न दिल्यास इम्रान सरकारसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पाकिस्तान सरकारमध्ये आतापर्यंत कुठलाच करार झालेला नाही. सौदीने कर्ज न दिल्यास आणि आयएमएफने 1 अब्ज डॉलर्सचा हप्ता प्रदान न केल्यास देशाचा दैनंदिन खर्च करण्यासाठी पाकिस्तानचे सरकार पैसे कुठून आणणार असा प्रश्न उभा ठाकणार आहे.