खालिद रजावर झाडल्या गोळय़ा ः 7 दिवसांपूर्वी हिजबुल कमांडरचा मृत्यू
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानातील कराची शहरात सोमवारी काश्मीरमधील दहशतवादी संघटना अल-बद्रचा कमांडर सैयद खालिद रजा मारला गेला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी रजावर गोळय़ा झाडल्या आहेत. खालिद हा काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. सिंधुदेश रिव्होल्युशनरी आर्मीने (एसआरए) खालिद रजाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
हल्लेखोरांनी खालिद रजाला त्याच्या घराबाहेरच ठार केले आहे. खालिद रजा हा काश्मीरमध्ये दहशतवादी कमांडर राहिला आहे. काही काळापूर्वी तो कराचीमध्ये वास्तव्यास आला होता. कराचीमध्ये खालिद हा फेडरेशन ऑफ प्रायव्हेट स्कुलचा उपाध्यक्ष झाला होता.
एका आठवडय़ात पाकिस्तानात मारला गेलेला हा दुसरा काश्मिरी दहशतवादी आहे. मागील आठवडय़ात हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर बशीर अहमद पीर देखील मारला गेला होता.
बशीर अहमद पीर हा हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा यासारख्या संघटनांकरता पूर्वाश्रमीच्या दहशतवाद्यांना एकजूट करण्यासाठी अनेक ऑनलाइन कारवायांमध्ये सामील होता. मागील वर्षी 4 ऑक्टोबर रोजी बशीरला दहशतवादी घोषित करण्यात आले होते.
मागील आठवडय़ात गुरुवारी बशीर स्वतःच्या घरानजीकच्या मशिदीत नमाज पठण करण्यासाठी गेला होता. मशिदीतून बाहेर पडलेल्या बशीरवर बाइकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळय़ा झाडल्या होत्या. बशीरला इम्तियाज आलम या नावानेही ओळखले जायचे. बशीरला पाकिस्तान सरकारने स्वतःच्या देशाचे नागरिकत्व दिले होते.