प्रतिनिधी/ बेंगळूर
15,000 पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षकांच्या भरतीसाठी तात्पुरती नवीन यादी सोमवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भात शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. 15,000 पदवीधर प्राथमिक शाळांच्या भरतीबाबत राज्य उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर नवीन तयार केलेली ‘1:1 तात्पुरती निवड यादी’ प्रकाशित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
याबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांनी 04 मार्च 2023 पूर्वी संबंधित जिल्ह्याचे उपसंचालक (प्रशासन) कार्यालय आणि नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्षपणे सादर करावेत. कर्नाटकच्या सार्वजनिक शिक्षण विभागाने 1:1 च्या प्रमाणात 15,000 पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षकांच्या भरतीसाठी गेल्या नोव्हेंबर महिन्यात ’तात्पुरती निवड’ यादी प्रसिद्ध केली होती. परंतु इतर मागासवर्गीयांच्या जात व उत्पन्नाच्या प्रमाणपत्राबाबत खात्याच्या नियमाचा गोंधळ असल्याने काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे 30 जानेवारी रोजी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची तात्पुरती निवड यादी रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार आता नवीन निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.