दहशतवादी संघटनेच्या निर्देशानुसार शिया समुदायाविरोधात मोर्चा
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानात सिपाह-ए-सहाबा पाकिस्तान (एसएसपी) या दहशतवादी संघटनेने शिया मुस्लिमांच्या विरोधात सुन्नी मुस्लिमांना चिथावण्यास प्रारंभ केला आहे. पंथीय द्वेषाचे दृश्य कराचीतील रस्त्यांवर दिसून आले आहे. तेथे हजारोंच्या संख्येत एसएसपीच्या आवाहनानंतर निदर्शने करण्यासाठी पोहोचले होते. जमावाने ‘शिया’ समुदायाला काफिर ठरविणाऱया घोषणा दिल्या आहेत. तसेच शियांचे शिरकाण करण्याची धमकी देण्यात आली आहे.
समाजमाध्यमांवरही शिया-सुन्नी संघर्ष उफाळून आला आहे. पाहता पाहता ट्विटरवर हॅशटॅगशियाजिनोसाइड ट्रेंड करू लागले आहे. यात एका बाजूला सुन्नी समुदायाचे लोक शियांच्या विरोधात टिप्पणी करत होते. तर दुसरीकडे शिया समुदायाच्या लोकांनी इस्लाम आणि माणुसकीचा दाखला देत असे हल्ले बंद करण्याची मागणी केली आहे.
इस्लामविरोधी टिप्पणीचा आरोप
मागील महिन्यात मोहर्रमवेळी टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात काही शिया धर्मगुरुंनी इस्लामविरोधी टिप्पणी केल्याचा आरोप आहे. तेव्हापासूनच अनेक शिया मुस्लिमांवर धार्मिक पुस्तके वाचणे आणि धार्मिक कार्यक्रमात भाग घेतल्याप्रकरणी हल्ला करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या आफरीन यांनी ट्विट करत सांगितले आहे.
पत्रकाराला अटक
शियांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचाराचे वृत्तांकन करणारे पत्रकार बिलाल फारुकी यांनाच पोलिसांनी अटक केली आहे. हिंसाचारासाठी पाकिस्तान सरकारच जबाबदार आहे. दहशतवादी संघटनेला शियांच्या विरोधात निदर्शने आणि हिंसाचार करण्याची मोकळीक पाक सरकारनेच दिली आहे. पंतप्रधान इम्रान खान हेच यासाठी थेट जबाबदार असल्याचे उद्गार आफरीन यांनी काढले आहेत.
शेकडो शिया मुस्लिमांची हत्या
पाकिस्तानात मागील 5 वर्षांमध्ये शिया मुस्लिमांच्या विरोधातील हिंसाचार वाढला आहे. यादरम्यान शेकडोंच्या संख्येत शिया मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मारेकरी रक्ताद्वारेच शियांच्या घरांबाहेर ‘शिया काफिर आहेत’ लिहित आहेत. याचबरोबर शिया समुदायाचे अनेक तरुण आणि महिलाही बेपत्ता झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी शिया समुदायाच्या लोकांना धमकीचा संदेश दिला जात होता आणि त्यानंतर ग्रेनेडने हल्ला करून हत्या केली जात होती. शिया मुस्लिमांच्या विरोधात हिंसाचार करण्याचा आरोप एसएसपी या दहशतवादी संघटनेवरच आहे.