ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौदावा दिवस असून, या युद्धाची धग तीव्र आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा नावाची मोहीम राबवण्यात आली आहे. याचदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थीनी अस्मा शफीकची देखील युद्धग्रस्त भागातून सुटका केली आहे. त्याबद्दल तिने मोदी सरकार आणि किव्हमधील भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत.
पाकिस्तानच्या अस्मा शफीकची भारतीय अधिकाऱ्यांनी कीव्हमधून सुटका केली आहे. लवकरच ती तिच्या कुटुंबाला भेटणार आहे. वृत्तसंस्था एएनआयने या मुलीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानी मुलगी म्हणतेय, माझे नाव अस्मा शफीक आहे आणि मी पाकिस्तानची आहे. मी कीव्हमधील भारतीय दूतावास आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छिते, त्यांनी मला युद्धग्रस्त कीव्हमधून बाहेर पडण्यास मदत केली.
किव्हमधील भारतीय दूतावासांनी अस्माला युद्धग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढून पश्चिम युक्रेनला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.