लाहोर / वृत्तसंस्था
गेले काही दिवस पाकिस्तानमध्ये धर्मांधांच्या हिंसेचा आगडोंब उसळला आहे. या हिंसाचाराला तहरीक ए तब्बैक या दहशतवादी संघटनेला जबाबदार मानण्यात येत आहे. या संघटनेच्या हस्तकांनी पोलिसांवर हल्ले सुरू केले असून काही पोलिस अधिकाऱयांना पकडून यातना दिल्या आहेत. या संघटनेच्या काही म्होरक्यांना पाक सरकारने अटक केल्याने सूड म्हणून ही हिंसा भडकविण्यात आली आहे, असा संशय पाक प्रशासनाने व्यक्त केला आहे. जाळपोळ मोठय़ा प्रमाणात होत आहे.
शनिवारी लाहोरच्या यतीमखाना चौकात या संघटनेच्या हस्तकांना पकडण्यासाठी पोलीसांनी मोहीम चालविली होती. या परिसरातील या संघटनेच्या जागा रिकाम्या केल्या गेल्या होत्या. याचवेळी पोलीस आणि संघटनेचे हस्तक यांच्यात गोळीबार होऊन काही पोलीस व एका अधिकाऱयाला पळवून नेण्यात आले होते.
याच संघटनेने काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूतांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आंदोलन केले होते. फ्रान्सच्या एका नियतकालिकात मोहम्मद पैगंबर यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे फ्रान्सशी पाकिस्तानने संबंध तोडावेत आणि राजदूताची हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली होती. या मागणीने सध्या आणखी जोर धरला आहे. राजदूताची हकालपट्टी करण्यासाठी इम्रान सरकारला 20 एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला होता. तथापि, पोलिसांनी त्याआधीच तीन दिवस या संघटनेचा म्होरक्या साद हुसेन रिझवी याला अटक केली. त्यानंतर या संघटनेने देशव्यापी हिंसाचारास प्रारंभ केला.