नव्याने प्रक्रिया पूर्ण करून अधिसूचना जारी : आता प्रतिक्षा निवडणूक तारखेची
प्रतिनिधी / पणजी
आरक्षणाच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरलेल्या राज्यातील ’त्या’ पाच नगरपालिकांच्या आरक्षणासंबंधी पालिका प्रशासन खात्याने नव्याने प्रक्रिया पूर्ण करून काल मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे. नविन प्रक्रियेतून कायद्यानुसार महिलांना वाढीव आरक्षण देतानाच एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाचा घोळही संपविण्यात आला आहे. अधिसूचनेची प्रत राज्य निवडणूक आयोगालाही पाठविण्यात आली आहे.
मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे व सांगे या पाच पालिकांच्या प्रभाग आरक्षणावरून आधी उच्च न्यायालयाने सरकारला दणका दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही पालिका संचालनालय व राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले होते. त्यातून राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांना पद सोडावे लागले. त्यानंतर पालिका संचालकांनी संबंधित मामलेदारांची बैठक घेऊन सदर आरक्षणासंबंधी नव्याने प्रक्रिया पूर्ण केली व सदर घोळ सोडविला आहे.
मडगाव पालिका प्रभाग आरक्षण
नव्याने करण्यात आलेल्या आरक्षणानुसार मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांपैकी 1, 3, 6, 7, 9, 11, 12, 15, 18, 21 व 24 हे प्रभाग सर्वसाधारण ठेवण्यात आले आहेत. 2, 17 व 22 हे प्रभाग ओबीसीसाठी राखीव आहेत. 5, 13, 20 व 25 हे प्रभाग महिलांसाठी तर 4, 16 व 19 हे प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 14 अनुसूचित जाती महिलासांठी तर प्रभाग 8 अनुसूचित जमातीसाठी तर प्रभाग 23 अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे.
मुरगाव पालिकेत तब्बल 14 प्रभाग राखीव
मुरगाव पालिकेच्या 25 प्रभागांपैकी 2, 4, 5, 7, 12, 14, 16, 17, 18, 20 व 23 हे प्रभाग सर्वसाधारण ठेवण्यात आले आहेत. 6, 8, 11, 22 व 25 हे प्रभाग ओबीसीसाठी राखीव आहेत. 1, 10, 13, 15 व 21 हे प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. 3 व 19 हे प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 9 अनुसूचित जाती महिलासांठी तर प्रभाग 24 अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहेत.
म्हापशात 20 पैकी तब्बल 11 प्रभाग राखीव
म्हापसा पालिकेच्या 20 प्रभागांपैकी 2, 4, 5, 8, 14, 15, 16, 19 व 20 हे प्रभाग सर्वसाधारण ठेवण्यात आले आहेत. 1, 7, 10 व 12 हे प्रभाग ओबीसीसाठी राखीव आहेत. 9, 13 व 18 हे प्रभाग महिलांसाठी तर 6 व 17 हे प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 11 अनुसूचित जाती महिलासांठी तर प्रभाग 3 अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहेत.
केपे पालिकेत एकूण 15 प्रभाग
केपे पालिकेच्या 15 प्रभागांपैकी 4, 5, 8, 11, 14 व 15 हे प्रभाग सर्वसाधारण ठेवण्यात आले आहेत. 2 व 7 हे प्रभाग ओबीसीसाठी राखीव आहेत. प्रभाग 3 महिलांसाठी तर प्रभाग 1 व 6 ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 12 व 13 अनुसूचित जमातीसाठी, प्रभाग 9 अनुसूचित जमाती महिलांसाठी तर प्रभाग 10 अनुसूचित जाती महिलासांठी राखीव आहेत.
सांगेत 10 पैकी 6 राखीव प्रभाग
सांगे पालिकेच्या 10 प्रभागांपैकी 2, 4, 6 व 7 हे प्रभाग सर्वसाधारण ठेवण्यात आले आहेत. प्रभाग 1 व 8 ओबीसीसाठी राखीव आहेत. प्रभाग 5 महिलांसाठी. प्रभाग 9 ओबीसी महिलांसाठी. प्रभाग 3 अनुसूचित जाती महिलांसाठी तर प्रभाग 10 अनुसूचित जमाती महिलासांठी राखीव आहेत.
दरम्यान, या पालिकांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात आला असला तरी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा घोळ अद्याप कायम असल्यामुळे या पालिकांची निवडणूक प्रक्रिया मार्गी लागण्यात अजून काही दिवस वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.